औरंगाबाद : शहरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरू आहे. महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांचा मुक्काम मनपा हद्दीबाहेर हलविण्याची सूचना केली आहे. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडून नागरी वसाहतींमध्ये नाल्यात वराह मोकाट सोडून देण्यात येतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला आहे. याविरोधात महापालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता या तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वराहपालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व वराहपालकांना त्यांच्या वराहांना मनपा हद्दीबाहेर इतरत्र हलविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
शहरातील जवळपास सर्वच भागांत वराहपालन सुरू आहे. त्यात औरंगपुरा नाला, नारळीबाग नाला, मध्यवर्ती बसस्थानक, फाजलपुरा, बेगमपुरा, विद्यापीठ परिसर, शांतीपुरा, सातारा परिसर आदी भागांतील नाल्यांत मोकाट वराहांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात दहा हजारांहून अधिक वराहमहापालिका हद्दीत सुमारे १० हजारांहून अधिक वराह असल्याचा अंदाज मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वराहांना शहराबाहेर हलविण्यासाठी याआधीही प्रयत्न झाले. मात्र, त्यावेळी वराह पालकांच्या संघटनेने महापालिकेसमोर उपोषण केले. आधी आम्हाला बाहेर जागा उपलब्ध करून द्या, मगच आम्हाला हलवा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर मनपाकडून वराह बाहेर हलविण्याची प्रक्रिया थांबली होती.