औरंगाबाद : संशोधन ही अविरत चालणारी प्रक्रिया असून, पीएच.डी. संशोधन विषय आणि कार्य प्रबंधाचा दर्जा हे सर्व गांभीर्याने केले पाहिजे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विषयांत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्री-पीएच.डी. कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते.
कला व सामाजिक शास्त्रे, विज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र तसेच आंतरविद्या या चार शाखा अंतर्गत संशोधकांसाठी २ जानेवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान होणाऱ्या या कोर्ससाठी ४५ विषयांतील तब्बल ८१५ जणांनी नोंदणी केली. झूम व गुगल अॅपच्या माध्यमातून सदर कोर्स ऑनलाइन पद्धतीने दररोज सकाळी १० ते ५:३० दरम्यान होईल. मनुष्यबळ विकास केंद्राचे संचालक डॉ. एन. एन. बंदेला, सहसमन्वयक डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांच्यासह सहकारी कोर्सच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत. या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, समन्वयक डॉ. भारती गवळी, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.