छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध बीबी का मकबरा परिसरात सुरू असलेल्या उत्खननात मातीच्या भांड्यांची अनेक तुकडे सापडली आहेत. उत्खनन होणारी जागा मकबऱ्याचे बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी वापरली जात असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ही मातीची भांडी मजूर वापर असल्याचा अंदाजही लावला जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून बीबी का मकबऱ्यासमोर असलेल्या उंचवट्यातील जागेत उत्खनन करण्यात येत आहे. याठिकाणी आतापर्यंत मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहेत. उत्खनन करून मलबा हटवला गेल्याने विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. गडद हिरवा रंग, त्यात काही ठिकाणी लाल, पिवळ्या रंगाचा शिडकावा केल्यासारखा दिसणारा ‘ग्रीन जास्पर’ नावाचा दगडही याठिकाणी सापडला आहे. त्याबरोबरच मातीच्या भांड्यांचे अनेक तुकडे सापडले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिव कुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे.
नव्या जागेत उत्खननयाठिकाणी आता नव्या जागेत उत्खनन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी काय आढळून येते, याकडे आता लक्ष लागले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे सहायक अधीक्षण पुरातत्त्वविद डाॅ. प्रशांत सोनोने म्हणाले, प्राचीन काळातील मृदभांड्यांचा अभ्यास केला जातो आणि ठराविक मृदभांड्यांना कार्यालयात ठेवले जाते.