ते इतिहासच पुसायला निघाले असताना आपण गप्प बसायचे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 02:39 PM2021-08-25T14:39:56+5:302021-08-25T14:44:09+5:30

महाविकास आघाडी सरकार आपले असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, याची मला जाणीव आहे.

Do you want to remain silent while they are trying to erase history? : Praniti Shinde | ते इतिहासच पुसायला निघाले असताना आपण गप्प बसायचे का ?

ते इतिहासच पुसायला निघाले असताना आपण गप्प बसायचे का ?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रणिती शिंदे यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना सवाल

औरंगाबाद : देशाला काँग्रेसच ( Congress ) बळकट करू शकेल. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान कुठे माहिती आहे. ते तर सारा इतिहास पुसून टाकायला निघाले आहेत. अशावेळी आपण गप्प बसायचे का? लोकशाहीचे स्तंभ टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, हे लक्षात घ्या असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी केले. ( Do you want to remain silent while they are trying to erase history? : Praniti Shinde ) 

गांधी भवनात त्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. विधी मंडळ अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षा या नात्याने त्या मंगळवारी सकाळी शहरात दाखल झाल्या. दिवसभर विविध बैठकांना उपस्थित राहून त्यांनी संध्याकाळी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वेळ काढला. पक्ष कार्यालयात आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, असे नमूद करून त्या म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार आपले असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, याची मला जाणीव आहे. मात्र, ही कामे होतील यासाठी पक्षाचा प्रयत्न सुरू आहे.

यावेळी आमदार लहू कानडे यांनी सांगितले, सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या काँग्रेससमोर खोटारड्या लोकांनी आव्हाने निर्माण केलेली आहेत. आज देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. नेहरू नीतीद्वारे सामान्य माणसांना उभे करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना स्वीकारून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि लोकशाही ही मूल्ये दिली. लोकांच्या मनातून कॉंग्रेस गेलेली नाही, हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सुरेखा पानकडे व इब्राहिम पठाण आदींची यावेळी भाषणे झाली.

सध्या काँग्रेसची परिस्थिती चांगली नाही. भाजपच्या बी टीमला आवरण्याची गरज आहे. त्याशिवाय काँग्रेस मजबूत होणार नाही, असा इशारा डॉ. काळे यांनी यावेळी दिला. सुशीलकुमार शिंदे यांचे उत्तराधिकारी म्हणून तुमच्यावर मोठी जवाबदारी आहे. तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे ते प्रणिती शिंदे यांना उद्देशून म्हणाले.

मोहसीन अहमद यांनी मुस्लिम आरक्षणासंबंधीचे निवेदन दिले. सीमा थोरात, डॉ. पवन डोंगरे, अतिष पितळे, जयप्रकाश नारनवरे, मुदस्सर अन्सारी, योगेश मसलगे, महेंद्र रमंडवाल, सत्संग मुंढे, इक्बाल सिंग गिल, संजय पगारे, रेखा राऊत, अनिता भंडारी आदींनी प्रणिती शिंदे यांचा सत्कार केला. पारंपरिक वेषभूषेतील बंजारा महिलांनी हलगीच्या तालावर नृत्य करीत प्रणिती शिंदेंचे स्वागत केले. डॉ. अरुण शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले व सरोज मसलगे यांनी आभार मानले.

Web Title: Do you want to remain silent while they are trying to erase history? : Praniti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.