छत्रपती संभाजीनगर : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात २२ जानेवारी २०२४ ला भव्यदिव्य सोहळ्यात होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जय्यत तयारी सुरू केली आहे. यानिमित्त अयोध्येहून खास अक्षता व मंदिराचे छायाचित्र शहरात दाखल झाले आहे. दीड लाख कार्यकर्ते मराठवाडा व खान्देशातील १५ लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रण पोहोचविणार आहेत.
अक्षतांचे १५ कलश दाखलअयोध्येतून अक्षतांचे १५ कलश शहरात दाखल झाले आहेत. १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान देवगिरी प्रांतातील १५ जिल्ह्यांत अक्षता वाटप करण्यात येईल. रविवारी (दि.३ डिसेंबर)ला किराडापुरा येथील श्रीराम मंदिरात कलशांचे पूजन करण्यात आले. तेथून सर्व जिल्ह्यांत हे कलश पाठविण्यात आले आहेत.
२० हजार मंदिरांत सामुदायिक पूजाप्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येमध्ये सर्व भाविक जाणे शक्य नाही. यामुळे भाविक घराजवळील मंदिरात जाऊन तेथे ‘आनंदोत्सव’ साजरा करतील, यानिमित्त मंदिरप्रमुखांच्या तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत, त्याची यादी देण्यात आली आहे. सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची, प्रतिमेची सामूहिक पूजा, आरती करण्यात येणार आहे. देवगिरी प्रांतांतर्गत मराठवाडा व खान्देशातील २० हजार मंदिरांत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.-राजीव जहागीरदार, मंदिर अर्चक पुरोहित आयामप्रमुख, विहिंप (देवगिरी प्रांत)
स्क्रीन अन् लाइव्हशहरातील विविध भागांतील श्रीराम मंदिर व अन्य मंदिरांत २२ जानेवारीला एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यावर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
घरोघरी दीपोत्सव, फोटोपूजनविश्व हिंदू परिषदेच्या वतीने १ ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी जाऊन अक्षता व श्रीराम व मंदिराचे छायाचित्र वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी आपल्या घरी २२ जानेवारीला या श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा, आरती करावी व सायंकाळी घरासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा.-संजयअप्पा बारगजे, अध्यक्ष, विहिंप (देवगिरी प्रांत)