औरंगाबाद : ॲलोपॅथीसंदर्भात योग गुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेने आयएमए हाॅलसमाेर बुधवारी निदर्शने केली. या वेळी जोरदार घोषणा देत कायदेशीर कारवाई आणि साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.
या वेळी ‘आयएमए’च्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डाॅ. संतोष रंजलकर, सचिव डाॅ. यशवंत गाडे, उपाध्यक्ष डाॅ. अनुपम टाकळकर, डाॅ. सचिन सावजी, डाॅ. राजेंद्र शेवाळे, डाॅ. अनंत कुलकर्णी, डाॅ. रश्मी बोरीकर, डाॅ. उज्ज्वला झंवर, डाॅ. श्रीपाद जोशी, डाॅ. उज्ज्वला दहीफळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी आयएमए हाॅलमध्ये आयोजित बैठकीत उपस्थित डाॅक्टरांनी मनोगत व्यक्त केले. डाॅ. अनंत कुलकर्णी म्हणाले, कोरोनासंदर्भात काहीही माहिती नसताना बाबा रामदेव मनाला येईल ते बोलले. याविरुद्ध कायदेशीर लढा दिला पाहिजे. डाॅ. अनुपम टाकळकर म्हणाले, आयुर्वेदाची ढाल पुढे करून काहीही बोलले जाते. हे निर्षधार्ह आहे. बुवाबाजीकडे जाऊन उपचार घेणे थांबले पाहिजे. डाॅ. यशवंत गाडे म्हणाले, देशभरातील डाॅक्टरांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी लढा दिला जाईल.
आयुर्वेदाला विरोध नाही
डाॅ. संतोष रंजलकर म्हणाले, ‘आयएमए’ ही अराजकीय संघटना आहे. आयुर्वेदाला आमचा विरोध नाही. पण, ॲलोपॅथीची औषधी अनेक संशोधनानंतर येतात. बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे.
---
फोटो ओळ...
योग गुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्याविरुद्ध निदर्शने करताना डॉक्टर्स.