औरंगाबाद : कोकणात फिरण्यासाठी गेलेल्या डॉक्टर दांम्पत्य घरी परतल्यानंतर त्याच्या घरात दोन चोरटे शिरलेले होते. त्या चोरट्यांना त्यांनी आडविण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी दोघांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास डी-मार्टच्या पाठीमागे केशवनगर भागात घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली..
फिर्यादी डॉ. प्रसाद चंद्रकांत देशपांडे (रा. ०३, यशोधन बंगलो, केशवनगर,शहानुरवाडी) यांचे टिळकनगर येथे संकल्प नेत्र रुग्णालय असून, ते भुलतज्ज्ञ आहेत. १३ नोव्हेंबर रोजी ते डॉक्टर पत्नी रेणुका, मुलीसह मित्रासोबत काेकणात फिरण्यासाठी गेले होते. १७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मित्राला सोडून घरी पोहचले. त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा घरातील खिडक्याचे पडदे हलल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याचवेळी दुसऱ्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे रेणुका यांनी पती प्रसाद यांना आवाज दिला. गाडीतुन सामान काढत असलेले प्रसाद हे धावत आले. पहिल्या मजल्याच्या पायऱ्या चढत असताना दोन अनोळखी चोरटे युवक वरच्या मजल्यावरून खाली येत होते. त्या दोन पैकी एकाच्या हातात लोखंडी टॉमी होती. त्या दोघांना डॉ. प्रसाद यांनी आडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या झटापटीत एकाने प्रसाद यांच्या कपाळावर व डाव्या हातावर टॉमीने वार केले. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी पत्नी डॉ. रेणुका या धावल्या. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर चोरटे किचनच्या दरवाज्यातुन मागील बाजूने पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती समजताच सहायक आयुक्त विशाल ढुमे पाटील, निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करीत आहेत.
दागिने गेले चोरीला
चोरटे पळून गेल्यानंतर डॉक्टर दांम्पत्यांनी किचनच्या दरवाज्याची पाहणी केली. त्यात किचनचा दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी ८५ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने, आडीच हजाराचे परदेशी चलन व ७ हजार रुपये रोख असा एकुण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, डॉक्टरासोबत झालेल्या झटापटीत एका चोरट्याचा मोबाईल घराच्या हॉलमध्ये पडल्याचेही आढळून आले.