औरंगाबाद : पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून डॉक्टर महिलेने तिच्या पतीच्या कथित प्रेयसीच्या नातेवाइकांना अश्लील मेसेज पाठविल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा गुन्हा करण्यासाठी तिने नोकराचे सिमकार्ड वापरून फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सिमकार्डधारक परशुराम देवीदास वाघुले यास अटक केली, तर मुख्य आरोपी डॉ. शिल्पा बोलधणे यांना नोटीस बजावली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा भाऊ आणि पतीला १७ मे रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अश्लील मेसेज आले होते. त्यामुळे त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. संबंधित मोबाइल सिमकार्ड आरोपी परशुराम वाघुलेच्या नावे असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने कार्ड त्याच्या नावे असले तरी या कार्डचा वापर डॉ. शिल्पा बोलधणे करीत असल्याचे सांगितले. तो डॉ. बोलधणे यांच्याकडे कामाला आहे.
दरम्यान, डॉ. शिल्पा यांना त्यांच्या पतीचे तक्रारदार महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी डॉ. शिल्पा यांना चौकशीसाठी बोलावून घेत त्यांचा मोबाइल जप्त केला. त्यांना कायदेशीर नोटीस बजावून सोडण्यात आले.