वाळूज महानगर : रुग्णासमोरच डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीने तलाक दिल्याची घटना समोर आली. लिंबेजळगावातील (ता. गंगापूर) रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली असून, पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर डॉक्टर पतीविरुद्ध सोमवारी (दि.२८) वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळूज एमआयडीसी परिसरातील डॉ. समिना यांचे लग्न १६ जुलै २०१७ रोजी नात्यातील डॉ. जमील शेख (रा. बोरगाव सकानी, ता. सिल्लोड) यांच्या सोबत झाले होते. सासर खेडेगावात असल्यामुळे डॉ. समिना यांच्या वडिलांनी मुलगी व डॉक्टर जावयासाठी लिंबेजळगावात स्वखर्चाने दवाखाना सुरू करून दिला होता. लिंबेजळगावात डॉक्टर पती-पत्नी रुग्णसेवा करून आपली उपजीविका भागवीत होते. दरम्यानच्या कालावधीत या दाम्पत्याला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी डॉ. समिना यांचा छळ सुरू केला. त्यांना शिवीगाळ, मारहाण, तसेच शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींच्या वागणुकीत सुधारणा होईल, या आशेमुळे डॉ. समिना यांनी पती व सासरच्या मंडळींची तक्रार केली नव्हती.
रुग्णासमोरच दिला तलाक
या रुग्णालयात दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास डॉ. जमील यांनी पत्नीशी विनाकारण भांडण सुरू केले. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या सय्यद हरीश व सुलताना आलुरे यांच्या समोरच डॉ. जमील यांनी पत्नी डॉ. समिना यांना तीन वेळा तोंडी तलाक दिला. यापुढे आपल्यामध्ये कोणताही संबंध राहिलेला नाही, मला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणून डॉ. जमील पत्नीला एकटीच सोडून निघून गेले. डॉ. समिना यांनी सोमवारी पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे तपास करीत आहेत.