औरंगाबाद : गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना २५ वर्षांच्या आरएमओ डॉक्टराने परिचारिकेवर बळजबरीने अत्याचार केला. यातून परिचारिकेला दिवस गेल्यानंतर डॉक्टराने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन विनासंमती गर्भपात केला. या डॉक्टराच्या तीन मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दामिनी पथकाने केलेल्या मदतीनंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
आरोपींमध्ये डॉ. प्रसाद संजय देशमुख (वय २५), रेस्टॉरंटचा मालक दीपक पाटील, मेडिकल दुकानाचा चालक सचिन शिंदे याच्यासह आणखी एकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडिता आणि आरोपी डॉक्टर हे एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतात. देशमुखने नोव्हेंबर २०२१ पासून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पडेगाव येथील फ्लॅटवर व अन्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. डॉक्टरने तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. यात पीडितेला प्रचंड वेदना झाल्या. त्यामुळे ती पुन्हा डॉक्टरकडे गेली. त्याने तिला मुकुंदवाडी भागातील नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्यावर बलात्कार केला आणि निघून गेला. त्याचा मावस भाऊ दीपक पाटीलने पीडितेवर जबरदस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून ती बाहेर पडली. डॉक्टरचा मित्र सचिन शिंदे आणि त्याचा अनोळखी मित्र यांनीही तिचा विनयभंग केला. पीडिता सिडको बसस्थानकावर आली. तिची प्रकृती खालावलेली होती. तेथून ‘दामिनी’ला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची मदत मिळाली. अधिक तपास उपनिरीक्षक बागूल करीत आहेत.
सुरक्षारक्षकामुळे घटना उघडकीसपीडिता सिडको बसस्थानकात येऊन बसली होती. तिला वेदना असह्य होत असल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने दामिनी पथकाला फोनवर कळविले. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे, गिरिजा आंधळे यांच्या पथकाने येऊन पीडितेची विचारपूस करीत मुकुंदवाडी ठाण्यात नेले. तेथे निरीक्षक गिरी यांनी गुन्हा नोंदवला.