- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : डॉक्टर साहेब, म्हशीचे दूध काढायला कोणी नाही, रुग्णाला लवकर सुटी द्याहो, नातेवाईकांचा हा अजब आग्रह ऐकून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी शनिवारी चक्रावून गेले. क्षणभर काय बोलावे आणि काय नाही, हे कोणालाही सुचले नाही; परंतु उपचारासाठी जेवढे दिवस लागतील, तेवढे दिवस लागतीलच, असे डॉक्टरांनी बजावले.
जिल्हा रुग्णालयात कन्नड येथील रुग्ण दाखल असून, त्याला सुटी देण्यासाठी हा आग्रह केला गेला. या आग्रहाची जिल्हा रुग्णालयात चांगलीच चर्चा रंगली होती. जिल्हा रुग्णालयात सौम्य अवस्थेतील दाखल रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा रुग्णांना फारसा त्रास जाणवत नसतो. तरीही रुग्णाला किमान ७ ते १० दिवस रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे असते. असे असताना रुग्णाला लवकर सुटी देण्यासाठी सांगण्यात आलेले कारण ऐकून डॉक्टर हैराण झाले. यापूर्वीही सुटी देण्यासाठी डॉक्टरांना रुग्ण, नातेवाईकांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जातात; परंतु म्हशीचे दूध काढायला कोणी नाही, रुग्णाला लगेच सुटी द्या, हे कधीही ऐकण्यात आले नसल्याने हसावे की, संताप व्यक्त करावा, अशी अवस्था डॉक्टरांची झाली होती.
लवकर सुटी देण्यासाठी काहींनी सांगितलेली कारणे१) ड्यूटीवर रुजू व्हायचे आहे.२) मुलीला सासरी पाठवायचे आहे.३) आई, वडीलही अन्य रुग्णालयांत आहेत, त्यांची काळजी घ्यायची आहे.४) घरी लहान मुलांचा सांभाळ करायला कोणी नाही.५) काहीही त्रास नाही, उगाच का दाखल ठेवले.
रुग्णालयातून सुटीची घाई नकोरुग्णाला सुटी देण्यासाठी नातेवाईक अनेक कारणे सांगतात; परंतु रुग्णांनी, नातेवाईकांनी रुग्णाच्या सुटीची घाई करता कामा नये. उपचार पूर्ण झाल्यानंतर सुटी दिली जाते. सुटी झाल्यानंतर घरी गेल्यानंतरही काही दिवस काळजी घेण्याची गरज असते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.