औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने पतीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मृताचा पती धनंजय डोंगरे हा पळून गेला आहे. सातारा पोलिसांनी मृताचा सासरा वसंत डोंगरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
डॉ. वर्षा अंबादास व्यवहारे आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा. सावरगाव पोखरी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी तीन वर्षांच्या प्रेमानंतर २ मे २०२२ रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केला. डॉ. वर्षाच्या कुटुंबाने धनंजयला स्वीकारले. मात्र, धनंजयचे कुटुंब वर्षाची जात आणि तिच्या दिसण्यामुळे समाधानी नव्हते. त्यांना धनंजयचा दुसरा विवाह करायचा होता. धनंजय, सासरा वसंत आणि सासू सिंधू यांनी डॉ. वर्षांचा छळ केला. या छळाला कंटाळून वर्षा यांनी इन्सुलिनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली. वर्षाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा नोंदवला. सातारा ठाण्यातील गुन्हे शाेध पथकाने वसंत यास अटक केली. त्याच वेळी धनंजय हा मोबाइल बंद करून पळून गेला. त्याच्या शोधासाठी पथक पाठविल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात पोलीस सर्व बाजूंनी तपास करतील. त्यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. विवाहितेचा छळ करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आरोपी केले जाईल.- विशाल ढुमे, सहायक आयुक्त, उस्मानपुरा विभाग