आडूळ : आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पैठण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज व त्यांच्या पथकाने अचानक भेट दिली. तेव्हा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून कारवाईचे संकेत दिले आहेत.
ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयी राहावे, असे कडक आदेश दिले आहेत, असे असताना मात्र आडूळ येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आडूळ परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून आडूळ येथे कोट्यावधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. गेवराई आगलावे, अंतरवाली खांडी, एकतुनी, कडेठाण, आडूळ खुर्द ही पाच आरोग्य उपकेंद्रे याच आरोग्य केंद्राशी संलग्नित आहेत. परिसरातील तब्बल ५० गावांतील रुग्ण तसेच महिला प्रसूतीसाठी, कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी येतात. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने बांधून दिलेली आहेत; परंतु येथे मोजकेच चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी वगळता सर्वच कर्मचारी औरंगाबाद शहरातून ये - जा करतात. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने परिसरातील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत.
यासंदर्भात काही नागरिकांकडून वरिष्ठ कार्यालयात तक्रार देखील करण्यात आली. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज, तालुका पर्यवेक्षक अनिल मगर व त्यांच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. तेव्हा फक्त दोन आरोग्य सेवक, एक कंत्राटी आरोग्य सेविका, एक शिपाई हजर असल्याचे दिसून आले; तर नियुक्त करण्यात आलेल वैद्यकीय अधिकारी डॉ. नीळकंठ चव्हाण, डॉ. सय्यद रुहिना व इतर कर्मचारी गैरहजर आढळून आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आगाज यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत प्रश्न विचारले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. दिवसेंदिवस आडूळ परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित कसे राहू शकतात, असे म्हणत डॉ. आगाज यांनी नाराजी व्यक्त केली.
या आरोग्य केंद्रात कोणताही वैद्यकीय अधिकारी रात्री राहत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अचानक भेटी देऊन शहानिशा केली. यात दोन्हीही अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकाराचा पंचनामा केला असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येईल. - डॉ. भूषण आगाज, तालुका आरोग्य अधिकारी.
आरोग्य विभाग येथील अधिकाऱ्यांवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. यापूर्वी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोंडी समज दिली होती; परंतु त्यांच्यावर कोणताही फरक पडला नाही. रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नसल्याने त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील प्रा. आ. केंद्राची असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे. - शुभम पिवळ, पैठण पंचायत समिती सदस्य
फोटो :