औरंगाबाद : शहरात तीन हजारांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. खासगी डॉक्टर्स प्रत्येक रुग्णाकडून किमान दहा हजार रुपये फी वसूल करीत आहेत. यापुढे खासगी डॉक्टरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार केले तर दररोज दोनशे रुपयांप्रमाणे रुग्णांकडून दोन हजार रुपये घ्यावेत. प्रत्यक्षात रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केलेली असेल तर पाचशे रुपये घ्यावेत, असा आदेश मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. यापेक्षा जास्त दर रुग्णांकडून घेतल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये होम आयसोलेशनसाठी स्वतंत्र डॉक्टर टेबल टाकून बसलेले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला आम्ही दहा दिवस उपचार करणार आहोत, अशी हमी खासगी डॉक्टर देतात. दहा दिवसांची औषधे आणि गोळ्या संबंधित रुग्णांना एकाच वेळी देण्यात येतात. नंतर संबंधित रुग्णाला डॉक्टर फोन करूनही विचारत नाहीत. काही त्रास असल्यास फोन करा, एवढेच सांगतात. खासगी डॉक्टर्स पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनचे पत्र देण्यासाठी मागील वर्षभरापासून तब्बल दहा हजार रुपये प्रत्येकी घेत आहेत. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलेला आहे. ८० टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे.
सध्या शहरात तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दहा दिवस घरी उपचार घेऊन रुग्ण मोठ्या संख्येने बरेही होत आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्ण गंभीर झाला आणि त्याला नंतर खासगी रुग्णालयात किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असे उदाहरण नाही. मात्र, खासगी डॉक्टर्स रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क उकळत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली. प्रशासनाने यावर ताबडतोब निर्णय घेतला. होम आयसोलेशनसाठी खासगी डॉक्टरांनी फक्त १० दिवसांचे दोन हजार रुपये घ्यावेत. दररोज व्हिजिट केली असेल तर ५०० रुपये फी घ्यावी, असे आदेश प्रशासक यांनी मंगळवारी दिले.
असे वाढत गेले होम आयसोलेशनचे रुग्णतारीख - रुग्ण संख्या१७ मार्च - १४००१८ - १८००१९ -२२०८२० - २६१७२१ - २५००२२ - २७२५