औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांच्या ३९ पोलिसांच्या जागांसाठी ५ हजार ७२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये डॉक्टर, अभियंता, एमबीए, एमएस्सी, एमई, बीई, बीटेक, एमफार्मसी, एलएलबी, बीएस्सी ॲग्री, बीएस्सी, बीकॉम, बीबीए, बीएस्सी उत्तीर्ण युवकांचा समावेश आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये २१०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ११०२ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील ९०७ उमेदवार पात्र ठरले आहेत. कडक बंदोबस्तामध्ये पारदर्शकपणे भरतीप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
राज्य शासनाने पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यामध्ये औरंगाबाद ग्रामीणमध्ये शिपाई पदाच्या ३९ जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ५ हजार ७२५ उमेदवारांनी अर्ज केले असून, २ जानेवारीपासून उमेदवारांना कागदपत्रांची तपासणी, मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे. तीन दिवसांमध्ये २१०० उमेदवार बोलावले. त्यातील ११०२ उमेदवार हजर राहिले. मैदानी चाचणीत ९०७ उमेदवार पात्र ठरले असून, १९५ उमेदवार अपात्र ठरले. संपूर्ण भरती प्रक्रिया पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्यासाठी अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह ६ उपविभागीय अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, ९ सहायक निरीक्षक, १७ उपनिरीक्षक आणि १३५ अंमलदार तैनात केले आहेत. त्याशिवाय १८ व्हिडीओग्राफर कार्यरत असून, जिल्हा पोलिस मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
एका जागेसाठी १५७ उमेदवारग्रामीण पोलिसांमधील ३९ जागांपैकी २७ पुरुषांसाठी, तर १२ जागा महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुरुषांच्या एका जागेसाठी १५७ उमेदवार असतील, तर त्याचवेळी महिलांच्या एका जागेसाठी १२५ उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अतिशय जीवघेणी स्पर्धा पोलिस भरतीमध्ये असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले.