छत्रपती संभाजीनगर : वेदनेने विव्हळत येणाऱ्या रुग्णांचा त्रास डाॅक्टर समजून घेतात. परंतु, पुस्तक वाचता वाचता रुग्णसेवा देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या सेवा देवाखान्यातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. इतकेच काय तर औषधे लिहून देण्याऐवजी औषधांच्या नावाचा शिक्काच मारून रुग्णाच्या हाती कागद सोपविला जातो.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा मुकुंदवाडीत सेवा दवाखाना (क्र. ४) आहे. या ठिकाणी कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेच्या वेळेत पुस्तक वाचण्यात मग्न राहत असल्याची तक्रार काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे केली. प्रत्यक्ष पाहणी केल्यावर रुग्णसेवेच्या वेळेत या महिला वैद्यकीय अधिकारी पुस्तक वाचत असल्याचे निदर्शनास आले. रुग्ण समोर उभा असतानाही त्यांची नजर पुस्तकाच्या ओळींवरून हटत नव्हती. इतकेच नव्हे तर रुग्णांना सर्दी, खोकला असे सांगताच कोणतीही तपासणी न करता थेट शिक्का मारून बाजूच्या कक्षातून औषधे घेण्यासाठी पाठविले जात असल्याचे दिसले.
काय पाहिले ‘लोकमत’ने...?पहिला प्रकारएक महिला लहान मुलासह या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश करते. तेव्हा महिला अधिकाऱ्यांची नजर टेबलावरील पुस्तकावरच असते. ही महिला पुस्तकाच्या बाजूने उभी राहते. तेव्हा तिला टेबलासमोर उभे राहण्यास सांगण्यात येते. त्यानंतर ती महिला सर्दी, खोकला, टाचदुखीचा त्रास असल्याचे सांगते. त्यावर तपासणी न करताच थेट औषधांची नावे असलेला शिक्का मारून कागद दिला जातो.
दुसरा प्रकारकक्षासमोर रुग्णांच्या रांगा असतात. एक रुग्ण रागाच्या भरात बाहेर पडतो. त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले का? अशी विचारणा केली. तेव्हा त्या तपासत नाहीत, केवळ औषधे देतात, असे सांगितले.
पुस्तक वाचते, मोबाइल तर पाहत नाही ना..?रुग्ण नसताना मी पुस्तकाचे वाचन करते. अनेकजण मोबाइल पाहतातच ना. घाटी रुग्णालयातही शिक्के मारून औषधे दिली जातात. जी औषधे वारंवार द्यावी लागतात, त्यांचाच शिक्का आहे. उर्वरित लिहूनच दिली जातात. पुस्तक वाचण्यासाठी कोणत्याही रुग्णाला थांबवत नाही, कोणीतरी चुकीची माहिती मुद्दाम दिली, असे या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तक्रार प्राप्त, सक्त सूचनासंबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांविषयी काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना या संदर्भात कडक सूचना केली जाईल. औषधे लिहूनच दिली पाहिजेत. शिक्का मारून औषधे देता कामा नयेत. शिवाय रुग्णांना तपासूनच औषधे दिली पाहिजेत.- डाॅ. पी. जी. राठोड, वैद्यकीय प्रशासन अधिकारी, मराठवाडा