छत्रपती संभाजीनगर: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) अतिविशेषोपचारमधील मुत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागातील डॉक्टरांनी केलेल्या अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्याने विवाहित रुग्णाच्या मातृत्वा चा मार्ग सुकर झाला आहे. या शस्त्रक्रियेमुळे महिलेस वैवाहिक सुख मिळू शकेल.
या शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना घाटी चे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड म्हणाले की, घाटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात २५वर्षिय विवाहिता तिच्या आजाराविषयी सल्ला घेण्यासाठी आली होती.मुत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट गीते यांनी तिला तपासले तेव्हा तिच्यामध्ये स्त्रियांमध्ये असलेली सर्व लक्षणे विकसित झाली होती. रेडिओलॉजी विभागात तिच्या पोटाची सोनोग्राफी , सिटीस्कॅन आणि एमआरआय आदी तपासण्या डॉ. वर्षा रोटे आणि चमूने केल्या. यात रुग्ण महिलेस जन्मजात गर्भाशय ग्रीवा व योनीमार्ग नसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या आजाराला शास्त्रिय भाषेत 'एमआरकेएच सिंड्रोम' असे म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. पाच हजार स्त्रिमागे एखाद्या स्त्रीला असा आजार असतो.
या रुग्णाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे आणि ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी रुग्णाचा पती,आई,वडिल आणि मामा यांना सांगून त्यांचे समुपदेशन केले. नातेवाईकांच्या संमतीनंतर रुग्णाच्या पोटातील मोठ्या आतड्याचा अंदाजे १० ते १५ सेंटीमीटरचा भाग त्याच्या रक्त पुरवठ्यासहीत वेगळा करून त्याचे योनीच्या जागी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेने रुग्णाचे वैवाहिक आयुष्य चांगले होणार आहे. शस्त्रक्रियेस तीन तास लागले. या शस्त्रक्रियेमुळे महिला तंदुरूस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया डॉ. गीते यांनी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश हरबडे, सहायक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब ढाकणे यांंच्या सहकार्याने केली. भूलतज्ज्ञ डॉ.रश्मी बंगाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवाय परिसेविका अर्चना वानखेडे, अधिपरिचारक गावेर्धन सिनारेची मदत झाल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.
महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेस खाजगी रुग्णालयात सात ते आठ लाख रुपये खर्च येतो. महाराष्ट्रातील मुंबईतील जे.जे. रुग्णालय, वारणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि अन्य एका ठिकाणी अशी शस्त्रक्रिया होते.मात्र खाजगी रुग्णालयाचा खर्च रुग्णाला परवडणारा नव्हता.शिवाय मुंबईला जाण्याची त्यांची तयारी नव्हती. यामुळे मागील दहा वर्षापासून रुग्णाचा आजार माहिती होऊनही त्यांनी शस्त्र्रक्रिया केली नव्हती. घाटीतील यशस्वी शस्त्रक्रियेने नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आमच्यासाठी मोठे असल्याचे अधिष्ठाता म्हणाले.