संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कधी रुग्णालयातून अचानक फोन येतो आणि लगेच धाव घ्यावी लागते...तर कधी रुग्णांची इतकी संख्या की घरी जाण्यासाठीही वेळ नाही...ही स्थिती आहे डाॅक्टरांची. कोरोना महामारीला गेल्या १४ महिन्यांपासून दिवसरात्र सामोरे जात आहेत. रुग्णसेवा देताना अनेक डाॅक्टर्स स्वत:ही कोरोनाबाधित झाले. अशा कोरोना महामारीच्या काळात अनेक डाॅक्टरांचे वजन घटले आहे. कोणाचे धावपळीमुळे वजन कमी झाले आहे, तर काहींनी सुदृढ आरोग्यांसाठी स्वत:हून वजन कमी केले आहे.
‘डाॅक्टर साहेब ,वजन कमी झालेले दिसते’ असा संवाद सध्या कोरोना रुग्णांवर उपचार देणाऱ्या डाॅक्टरांना जवळचे लोक अनेक दिवसांनंतर भेटल्यानंतर होताना पाहायला मिळत आहे. डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाविरुद्ध दिवसरात्र लढा देत आहेत. या सगळ्याचा परिणाम, त्यांच्याही आरोग्यावर होत आहे. ‘लाेकमत’ने काही डाॅक्टरांशी चर्चा केली, तेव्हा अनेकांनी वजन कमी झाल्याचे सांगितले.
घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, कोरोना काळात नक्कीच धावपळ वाढली. त्यातून वजन काही प्रमाणात कमी झाले आहे. पण सर्वच जण दिवसरात्र काम करीत आहेत. केवळ डाॅक्टरच नव्हे इतर कर्मचारी चांगले काम करीत आहेत. निवासी डाॅक्टर रात्र रात्र जागून रुग्णसेवा देत आहेत.
डाॅ. सुधीर चौधरी म्हणाले, कामाचा भार, ताणतणाव याचा परिणाम निश्चितच जाणवतो. ६० किलोवरून ५८ किलो वजन झाले. मार्डचे अध्यक्ष डाॅ. आबासाहेब तिडके म्हणाले, २४ तास रुग्णसेवेसाठी दक्ष रहावे लागते. त्यामुळे तशी प्रत्येकाची मानसिकताही असतेच. कोरोना काळात सुरुवातीला निवासी डाॅक्टरांची धावपळ झाली. पण आता हे तास कमी झाले आहेत. अनेकदा जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत. त्यातून वजनावर परिणाम होतो. त्यातही रुग्णसेवा देताना गेल्या १४ महिन्यांत २३६ निवासी डाॅक्टर कोरोनाबाधित झाले.
तब्बल १४ किलो वजन कमी
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांनी गेल्या वर्षभरापासून स्वत:ला रुग्णसेवेत झोकून घेतले. परिणामी, अनेकांकडून स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. माझे काेलेस्ट्राॅल वाढले होते. त्यामुळे शरीरासाठी थोडा वेळ दिला आणि वजन कमी केले. आधी ८४ किलो वजन होते. आता ७० किलो वजन झाले आहे. १४ किलो वजन कमी केले, असे घाटीचे वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. विकास राठोड यांनी सांगितले.
९० वरून ८३ किलोवर वजन
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅ. किरण चव्हाण म्हणाले, कोरोनात रुग्णसेवा देताना सप्टेंबरमध्ये मीदेखील कोरोनाबाधित झालो. त्यानंतर मला प्री-डायबेटिजचे निदान झाले. त्यापूर्वी कधीही शुगर वाढली नव्हती. पण कोरोनानंतर शुगर वाढली. त्यामुळे आहार नियंत्रित ठेवावा लागत आहे. वजनही कमी केले. ९० किलोवरून आता वजन ८३ किलोवर आले आहे. ७ किलो वजन कमी झाले.