कुख्यात गुन्हेगार टिप्या हा त्याच्या साथीदारांसह बायपासकडून विजयनगरमार्गे पुंडलिकनगरकडे दुचाकीवर बसून येत असल्याची व त्याच्याजवळ गावठी पिस्टल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सपोनि सोनवणे, फौजदार धनाजी आढाव, हवालदार रमेश सांगळे,बाळाराम चौरे,राजेश यदमळ, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, दीपक जाधव, विलास डोईफोडे, अजय कांबळे, प्रवीण मुळे यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी विजयनगर चौकात सापळा रचला. समोर पोलीस असल्याचे पाहून दुचाकीवर मागे बसलेला आरोपी शेख जावेद ऊर्फ टिप्प्या पोलिसांना पाहून दुचाकीवरून उडी मारून पळून गेला. यावेळी त्याचा साथीदार शेख सोहेल दुचाकी दामटण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. पंचांसमक्ष त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता. सीटखाली त्याने लपवून ठेवलेले गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली. याप्रकरणी पोलीस हवालदार बाळाराम चौरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी टिप्यासह शेख सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकट
शस्त्र विक्रीसाठी जाताना आरोपी पकडला
आरोपी टिप्या आणि त्याचा साथीदार सोहेल गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधण्यासाठी घराबाहेर पडले आणि पोलिसांच्या हाती लागले. आरोपी सोहेल हा वाळूविक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याविरुद्ध मारहाण करणे, जमिनीवर अतिक्रमण करणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले.
(फोटोसह )