सोयगाव : तालुक्यात सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची पायपीट होत असल्याचे समोर आले आहे. ही पायपीट आहे ती सन्मान योजनेच्या अर्जावर लागणाऱ्या स्वाक्षरीसाठी. त्यामुळे कोणी सही देता का सही, अशी म्हणण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे.
सन्मान योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय योजनेचा अर्ज ऑनलाइन होत नाही. नव्याने सन्मान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वाक्षरीच मिळत नसल्याने फरफट होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. सन्मान योजनेसाठी नव्याने पात्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्जावर स्वाक्षरीसाठी थेट सोयगावला शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, कार्यालयात सक्षम अधिकाऱ्याची भेट होत नसल्याने कोणी स्वाक्षरी देता का साहेब, असे शेतकऱ्यांना म्हणावे लागत आहे. तर कार्यालयात त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी कोणी तयार नसल्याने उन्हातान्हात पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातीच घराकडे परतावे लागत आहे. कारण, नव्याने केल्या जाणाऱ्या अर्जावर नेमकी कोणाची स्वाक्षरी घेतली पाहिजे, याबाबतचा सक्षम अधिकारी नेमला गेला नाही. सन्मान योजनेचा अर्ज आणि लाभाची कागदपत्रे घेऊन शेतकरी तहसील आणि कृषी कार्यालयात चकरा मारत असतो. कृषी कार्यालयात गेल्यावर कृषी विभाग म्हणतो, महसूलकडे जा आणि महसूल विभाग पुन्हा कृषी विभागाकडे जाण्याचा उपदेश देत आहे. यावर स्वाक्षरी कोण देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
--------------
स्वाक्षरीशिवाय अर्ज ऑनलाइन होईना
सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय सन्मान योजनेचा अर्ज ऑनलाइन होत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अर्ज करताना महसूलचे अव्वल कारकून अथवा नायब तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याची चर्चा आहे. परंतु, मध्येच आता स्वाक्षरी कोणी करायची यावर चर्चा सुरू झाली आहे.