औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावर मालकाच्या हातातील कुत्रा धावला. त्यामुळे महिला कोसळली. यात महिलेचा डावा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना शस्त्रक्रिया करुन रॉड टाकावा लागला. एवढा प्रकार झाल्यानंतरही कुत्र्याचा मालक हा बाई नाटक करते, म्हणून निघून गेला होता. या प्रकारणात गुरुवारी मालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आर. के. पवार (रा. देशमुखनगर) असे कुत्रा मालकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गयाबाई शेषराव पवार (६५, रा. बारावी योजना, शिवाजीनगर) या पेन्शनर आहेत. २० सप्टेंबरला सकाळी सात वाजता त्या माॅर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या. देशमुखनगर भागातून पायी जात असताना साडेसातच्या सुमारास काश्मिरा मसाले दुकानासमोर एक पाळीव कुत्रा त्यांच्या अंगावर धावला. त्यामुळे गयाबाई पवार या घाबरल्या आणि खाल्या पडल्या. त्यात त्यांच्या डाव्या हाताला व पायाला मार लागला.
तेथून पायी जाणाऱ्या व्यक्तींनी गयाबाई यांच्या मुलाला फोन करून तेथे बोलावून घेतले. त्यानंतर मुलाने गयाबाई यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तपासणी करून हात व पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर कुत्र्याच्या मालकाचे नाव आर. के. पवार असल्याचे समजले. तसेच, घटना घडली तेव्हा ते तेथे होते आणि ते ही बाई नाटक करते, असे म्हणून निष्काळजी दाखविली होती. त्यामुळे दवाखान्यातून सुटी झाल्यावर गयाबाई यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.