औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवर सध्या मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल १२०० जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे.शहरात दररोज मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषत: लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. पुंडलिकनगर, बजाजनगरसह अन्य भागांमधील पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा प्रकार बुधवारी घडला. शहरातील रेल्वेस्टेशन, जवाहर कॉलनी, गारखेडा, बेगमपुरा, औरंगपुरा, जटवाडा रोड, सुराणानगर, मोतीवालानगर, व्यंकटेशनगर, सिडको टाऊन सेंटर, चिकलठाणा, मुकुंदवाडी इ. भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. कोणत्या वेळी कुठून कुत्रे येईल आणि लचका तोडील, याचा भरवसा नाही. विशेषत: रात्रीच्या वेळी ही मोकाट कुत्री अधिक हिंसक होतात. येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीच्या पाठीमागे धावतात.
रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 12:17 AM