- शेख मुनीरऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे पंधरा दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. त्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गावर सायकल, ट्रॅक्टर, रिक्षा, दुचाकीसह प्राणी, पायी चालणाऱ्यांनाही परवानगी नाही. मात्र, सावंगी ते लासूर परिसरापर्यंतच्या महामार्गावर अनेक ठिकाणी कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून आला. त्याशिवाय रस्त्यालगतच्या कठड्याजवळ गाय, म्हशी, शेळीसह इतर प्राण्यांचा वावरही ‘लोकमत'च्या पाहणीत आढळून आला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहने वेगवान पद्धतीने चालविण्याची स्पर्धा लागली आहे. या मार्गावर पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण मिळविणे जिकिरीचे बनले आहे. यातच वेगात गाडी असताना अचानकपणे प्राणी समोर येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. ‘लोकमत'कडून सावंगी ते लासूर परिसरातील समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये वेगवान वाहनांच्या समोर अचानक आलेल्या कुत्र्यांमुळे प्रसंगावधान राखत चालकास ब्रेक लावाला लागला. ही कुत्री झुंडीनेच ‘समृद्धी’वर फिरतात. काही भरधाव वाहनांच्या पाठीमागेही कुत्रे धावत होते. नागपूरहून शिर्डीकडे जाणाऱ्या क्रूझरसमोर (एमएच २० डीजे १३९१) अचानकपणे एक कुत्रे समोर आले. त्यात १० पेक्षा अधिक माणसे होती. चालकाने कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे भीषण अपघात टळला. त्याशिवाय एमएच ०९ बीएच ३१५४, एमएच ४९ बी ८४६०, एमएच १४ जीवाय ७५९९ आणि एमएच १५ ईवाय २६४५ या वाहनांच्या समोरही अचानक कुत्रे आले. या मोकाट कुत्र्यांमुळे ‘समृद्धी’वर भीषण अपघाताचा धोका पाहणीत दिसला.
इतर प्राण्यांचीही ‘समृद्धी’च्या हद्दीत घुसखोरीसमृ्द्धी महामार्गावर कोणीही येऊ नये यासाठी दोन पद्धतीचे अडथळे निर्माण केले आहेत. पहिला अडथळा हा समृद्धीची हद्दी असलेल्या ठिकाणी भिंत उभारून निर्माण केला. प्राणी, जनावरे, माणसे, वाहने घुसू नयेत यासाठी लोखंडी कठडा बसविला आहे. कठड्याखालून कुत्री, मांजरे थेट रस्त्यावर येतात. भिंतीच्या आत गाय, म्हशी, शेळीसह इतर प्राणी चारण्यासाठी शेतकरी घेऊन येत असल्याचेही दिसून आले.
नागरिकांनी विचार करावा....समृद्धी महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलिसांची गस्त नियमित सुरू आहे. सुरक्षा कठड्याला जनावरे बांधण्यापूर्वी नागरिकांनीदेखील विचार करावा. वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर जनावरे आली तर अपघात होऊ शकतात.-बी. पी. साळुंके, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी.