औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच जर अंत्योदय व प्राधान्य कु टुंब योजनेंतर्गत तुरीची डाळ व साखर वितरित केली गेली असती, तर गरिबांची ही दिवाळी अधिकच आनंदात साजरी झाली असती.सध्या स्वस्त धान्य दुकानांमधून नियमितपणे गहू व तांदळाशिवाय काहीच मिळत नाही. रॉकेलसुद्धा मिळत नाही. दिवाळीसाठी म्हणून सरकारने तुरीची एक किलो डाळ, एक किलो साखर उपलब्ध करून देण्याचे ठरविले. मिठाचे वाटप मात्र आधीच झाले. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत तुरीची डाळ एक किलो ३५ रुपये या भावाने आणि एक किलो साखर २० रुपये या भावाने देण्यात येत आहे.पूर्वी स्वस्त धान्य दुकानांमधून पाम आॅईल, तूप, रवा, मैदा, हरभºयाची डाळ अशा तेरा वस्तू उपलब्ध करून दिल्या जात होत्या. यापूर्वीच्या सरकारमध्ये हे घडत होते; परंतु आता सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.औरंगाबाद जिल्ह्यात १८५० स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यात १९९ दुकाने औरंगाबाद शहरातील आहेत. या दुकानांमधून सध्याही गरिबांना डाळ आणि साखर वितरित केली जात आहे. या दुकानांमध्ये ई-पॉज मशिन्स बसवण्यात आल्या आहेत.यासंदर्भात बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी सांगितले, दिवाळीनिमित्त मिठाचे वाटप पूर्वीच झाले आहे. डाळ आणि साखरेचे वाटप सुरू आहे. कुठेही गडबड नाही. वितरणात सुरळीतता आहे.स्वस्त धान्य दुकानदारांचे नेते डी.एन. पाटील यांच्या म्हणण्यानुसार जसजसा माल उपलब्ध होतोय तसे त्याचे वाटप दुकानदार करीत आहेत. हे वाटप गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. थोडेसे आधीच झाले असते तर बरे झाले असते.डीबीटीला विरोध...२९ सप्टेंबर २०१८ रोजी रोख लाभ हस्तांतरणाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. याअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या पसंतीनुसार रोख धान्य अथवा रोख रक्कम देण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तसेच परवानाधारकांनाही कमिशन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे; पण देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा या योजनेला विरोध असून, त्याविरुद्ध आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
दिवाळीत रेशनवरील डाळ , साखर मिळण्यास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:23 PM
गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे.
ठळक मुद्दे दोन दिवसांपूर्वी आला माल: पूर्वी मिळायचे तूप, रवा, मैदा व हरभऱ्याची डाळ