औरंगाबाद : एकीकडे कोरोनामुळे उत्पन्न कमीकमी होत असताना दुसऱ्या बाजूला महागाईने आकाश गाठले आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये २५.५० रुपये वाढ होऊन आजपासून ८४३.५० रुपयांस विकत घ्यावा लागणार आहे. आता सिलिंडर हजार रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने सर्वसामान्य जनता महागाईत आणखी होरपळणार आहे.
गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. कारण, आज गॅस कंपन्यांनी सिलिंडरमागे चक्क २५ रुपये ५० पैशांची वाढ केली. एप्रिल महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत ८१८ रुपये होती. जानेवारी २०२१ मध्ये ७०३ रुपयांनी सिलिंडर विकत होते. फेब्रुवारीत ७५ रुपये भाववाढ होऊन ७७८ रुपये किमत झाली होती, मार्चमध्ये यात आणखी ५० रुपयांची वाढ होऊन ते ८२८ रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, एप्रिलमध्ये १० रुपयांनी किंमत कमी होऊन ८१८ रुपयांना सिलिंडर मिळत होते; पण हा दिलासा जास्त काळ टिकला नाही. तीन महिन्यांनंतर सरकारने एकदम २५.५० रुपयांची वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मागील सहा महिन्यांत १४०.५० रुपयांनी सिलिंडर महागले आहे. आता हजार रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी १५६.५० रुपयांचे अंतर राहिले आहे. अशीच भाववाढ होत राहिली तर परिस्थिती येत्या ४ ते ६ महिन्यांत सिलिंडर एक हजार रुपयांना विकत घ्यावे लागेल, असे गॅस एजन्सीच्या मालकाने सांगितले.
चौकट -
शंभरीपासून डिझेल २ रुपये दूर
१ जुलै रोजी पेट्रोल प्रतिलिटर १०६.१४ रुपये होते. शहरात १७ मे रोजी पेट्रोलने शंभरी गाठली होती. पॉवर पेट्रोलने फेब्रुवारीतच शंभरी पार केली. आता पेट्रोलपाठोपाठ डिझेल १०० रुपयांपासून अवघे २ रुपये ४ पैसे मागे आहे. गुरुवारी ९७.९६ रुपये लिटर डिझेल विकत होते. यामुळे मालवाहतुकीत भाडेवाढ झाली असून, परिणामी जीवनावश्यक वस्तूचे भावही भडकत आहेत.
चौकट -
सिलिंडर भाववाढ
महिना.. वर्ष.... सिलिंडरची किंमत
एप्रिल २०२० ७५० रुपये
मे २०२० ५८५ रुपये
जून २०२० ५९८ रुपये
जुलै २०२० ६०१.५० रुपये
ऑगस्ट २०२० ६०३ रुपये
डिसेंबर २०२० ६५३ रुपये
जानेवारी २०२१ ७०३ रुपये
फेब्रुवारी २०२१ ७७८ रुपये
मार्च २०२१ ८२८ रुपये
एप्रिल २०२१ ८१८ रुपये
जुलै २०२१ ८४३.५० रुपये.