बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. लाखो नागरिक दररोज ज्या जलाशयाचे पाणी पितात, तिथे सुरक्षारक्षकही नियुक्त नाही. काटेरी झुडपे, मोठी झाडे यामुळे संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.निजामकालीन घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना शहराला गुरुत्वाकर्षण पद्धतीने विनाखर्च पाणी उपलब्ध होते. याउलट परिस्थिती जायकवाडी-जालना पाणीपुरवठ्याची आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी पालिकेला महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीकडे पालिका प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने जलाशयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. जलाशयाच्या आतील बाजूच्या संरक्षण भिंतीवर ठिकठिकाणी मोठी झाडे उगवली आहेत. संरक्षक भिंतीतून पाणी झिरपू नये यासाठी बसविण्यात आलेले दगड उखडत आहेत. वरील बाजूस काटेरी झुडपांमुळे संरक्षक भिंतीला पाझर फुटले आहेत. यातून झिरपणारे पाणी दुसऱ्या बाजूने थेट रस्त्यावर येत असल्याने जलसाठ्यात वाढ झाल्यास गळतीचा धोका निर्माण झाला आहे. संरक्षण भिंतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलाशयाच्या टाकीवर चढून अनेक जण ‘सेल्फी’ घेतात. सेल्फीच्या नादात एखादी व्यक्ती पाण्यात पडून दुर्घटना घडू शकते. जलाशयाच्या वरील बाजूस अनेकांनी अतिक्रमण करून शेती सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी या परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवून पालिकेने सुमारे अडीचशे जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी न घेतल्याने परिस्थिती जैसे थे बनली आहे. गत वर्षी घाणेवाडी जलाशयाच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, वर्ष उलटूनही या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
घाणेवाडीची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:04 AM