औरंगाबाद : दरवर्षी एप्रिलच्या अखेरीस कडक उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवायला सुरुवात होते. मात्र, यावर्षी कोरोनाची भीती आणि घटलेली शिबिरांची संख्या, तसेच अशंत: लाॅकडाऊनचा फटका रक्तसंकलनाला बसला आहे. त्यामुळे आताच रक्तटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुसऱ्या डोस घेतल्यावर २८ दिवस म्हणजे दोन महिने रक्तदानासाठी थांबावे लागणार असल्याने रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनंतर केवळ दोनच शिबिरे झाले. त्यातही एका शिबिरात १४ तर दुसऱ्या शिबिरात ४ पिशव्या रक्तसंकलन झाले. आता अंशत: लाॅकडाऊन असल्याने शिबिरे पूर्णत: बंद झाली. घाटी रक्तपेढीत दिवसातून तीन ते चार जणच येऊन स्वेच्छा रक्तदान करत आहेत. तर घाटीला दिवसाकाठी ७० ते ८० तर कर्करोग रुग्णालय मिळून सुमारे १०० पिशव्यांची गरज भासते. यात सिकलसेल, ॲनेमिया, थॅलेसिमिया, प्रसूती, विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे शिबिर घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रक्तसंकलनाची गरज पूर्ण होणार नाही. रक्तदाते व शिबिर संयोजकांना रक्तपेढीकडून विनंत्या केल्या जात आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमनाच्या भीतीने दाते रक्तदानाला तयार होत नसल्याने शिबिर संयोजकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्यासाठी विनंती करत असून त्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनालाही सहकार्याची विनंती करणार असल्याची घाटी विभागीय रक्तपेढीकडून सांगण्यात आले.
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदानरक्तदानासाठी पात्र असलेल्या दात्यांनी आधी रक्तदान करावे. त्यानंतर लसीकरण करून घ्यावे. कारण पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस व त्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येईल, असे दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वैद्यकीय संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.
एप्रिलमध्ये जाणवणारा तुटवडा मार्चमध्येच जाणवायला सुरुवात झाली आहे. लहान लहान रक्तदान शिबिर तरी आयोजित व्हावे. शिबिर आयोजकांना पोलिसांची भीती आहे. लोक जमले तर गुन्हे दाखल होतील. मात्र, कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध रक्तदान शिबिर आयोजनासाठी प्रशासनाचे सहकार्य मागू. आयोजनासाठी मदत करू.- हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी, घाटी रुग्णालय
सुरक्षा सप्ताहात औद्योगिक वसाहतीत होणारे रक्तदान शिबिरे यावेळी झाली नाहीत. काही पुढे ढकलण्यात आली. सध्या शहरात कोणतेही शिबिरे होत नाही. काही शिबिरे ग्रामीण भागात झाली. त्यामुळे रक्तसंकलनावर परिमाण झाला आहे.-चंद्रकला अहिरे, व्यवस्थापक, दत्ताजी भाले रक्तपेढी
लस घेण्यापूर्वी मी केले रक्तदान, तुम्हीही करा...!मी लसही घेणार आहे. दुसऱ्या डोसनंतर मला २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. लसीकरण करायचे असल्याने त्यापूर्वी मी रक्तदान केले. रक्तदात्यांनी कोरोनाची भीती बाळगून रक्तदान करण्याला घाबरू नये. शक्य त्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे.-अभिषेक थोरात, एमबीबीएस विद्यार्थी
अशी आहे आकडेवारी : दररोज किती जणांना दिली जाते लस - ५७४७ आतापर्यंत झालेले लसीकरण - ६२,९५०जिल्ह्यातील रक्तपेढ्या - ८