औरंगाबाद : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्जदारांचे अर्ज विनाकारण रद्द करू नका. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करावे. जिल्हानिहाय रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी सोमवारी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात किसान क्रेडिट कार्ड योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांच्या विभागीय आढावा बैठकीत डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्जदारांचे अर्ज विनाकारण रद्द करू नका. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करावे. जिल्हानिहाय रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करावेत. स्वनिधी ते समृद्धी योजनेत औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून यात परभणी जिल्ह्याचा समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील.बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि. प. सीईओ नीलेश गटणे, उस्मानाबादचे जि. प. सीईओ राहुल गुप्ता, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, मुख्य व्यवस्थापक मंगेश केदारे यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे व नगर पालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त ऑनलाइन उपस्थित होते.
बँकांनी संवेदनशीलपणे काम करावेमराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शासन विविध योजना राबवित आहे. बँकांशी संबंधित असणाऱ्या योजनांचे कर्जवाटप करताना बँक अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे, अशा सूचना डॉ. कराड यांनी दिल्या. बँकांशी संबंधित योजनांचा मासिक आढावा घ्यावा. किसान क्रेडिट कार्ड योजनेत मासेमारी करणाऱ्या बरोबरच मत्स्यविक्रेत्यांचाही समावेश करणे गरजेचे असल्याचे सांगून मत्स्य व्यवसायाच्या शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.