औरंगाबाद : नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवीगाळसोबतच आमदार लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली आहे. आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड असे आव्हान करून आमच्यासोबत नीट राहायचे, एका मिनिटात सस्पेंड करून टाकेल, अशा धमक्या लोणीकर यांनी फोनवरून दिल्या आहेत.
औरंगाबादमधील सातारा परिसरात बबनराव लोणीकर यांचा एक बंगला आहे. येथे जाधव नावाच्या व्यक्तीच्या नावे वीज मीटर आहे. या ठिकाणचे दोन वर्षांपासूनचे ३ लाख रुपयांचे थकीत वीजबिल आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घराच्या अनेक चकरा मारल्या, मुलासोबत बोलणे झाले,तरीही बिल भरले नाही, असे महावितरणचे सहाय्यक अभियंता फोनवरून लोणीकर यांना सांगतात. मात्र, नोटीस न देता वीज मीटर कसे काय काढून नेले याचा जाब विचारत आमदार लोणीकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केलेले क्लिपमधून ऐकण्यात येते. परंतु, अभियंता मीटर काढून नेले नाही असे वारंवार सांगतात. याउपरही आ. लोणीकर यांनी अभियंत्याला, ''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'', असे आव्हानही देतात.
अभियंता यावर तुमचे मीटर काढून नेले नाही, मुलाला परवाच भेटलो असे सांगितलं. यावर आ. लोणीकर यांनी पुन्हा शिवीगाळ करत, मी ३० वर्ष आमदार आहे, नियमित बिल भरतो, कृषीपंपाचे, जालना, परतूरच्या घराचे बिल भरतो. नीट वागा, काचेची बांगडी आहात तुम्ही, आमच्या नादी लागू नका, आम्ही एक रुपया ठेवणारे माणस नाहीत. आयकरच्या धाडी टाकू,तुमची कुंडली आहे, घरी बसवू, नीट वागा, सस्पेंड करू शकतो, आमच्या नादी लागू नका असा इशाराही आ. लोणीकर यांनी अभियंत्याला दिल्याचे या ऑडीओ क्लिपमध्ये आहे. ही क्लिप सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. भाजपच्या एका आमदाराने विजबिलावरून केलेला संताप, दिलेल्या धमकांची सध्या चर्चा सुरु आहे. तर नागरिक, शेतकरी यांच्यावर कारवाई करणारे महावितरण आता काय पाऊल उचलते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे.
तो मी नव्हेच, माझ्या विरुद्ध षडयंत्रवीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.