ब्रेक दि चेनअंतर्गत जीवनावश्यक वस्तू आणि इतर काही मोजके व्यवसाय वगळता कित्येक व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. पहिल्या लॉकडाऊनदरम्यान सोसलेल्या नुकसानीच्या झळांची धग अजूनही कायम असून आता पुन्हा एकदा दुकाने बंद ठेवणे, लहान व्यावसायिकांना परवडणारे नाही. त्यामुळेच काळानुसार जुळवून घेत व्यवसायाची ही नवी युक्ती अनेक व्यावसायिकांनी शोधून काढली आहे.
याअंतर्गत व्यावसायिक थेट आपल्या ग्राहकांना लागणाऱ्या वस्तू किंवा सेवा घरपोच नेऊन देत आहेत. लॉण्ड्री, ब्यूटी पार्लर, सलून, स्टेशनरी, डीटीपी आणि झेरॉक्स, टेलरिंग, फुल विक्रेते यासारख्या अनेक व्यावसायिकांनी होम सर्व्हिसची सेवा सुरू केली आहे. याचा फायदा निश्चितच अनेक ग्राहकांना होत आहे.
ब्रेक दि चेनअंतर्गत आपला व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे, हे लक्षात येताच व्यावसायिकांनी तात्काळ सोशल मीडियाचा उपयोग केला आणि आपापल्या नियमित ग्राहकांना ‘होम सर्व्हिस’ सुरू असल्याचा संदेश पाठविला. इस्त्रीसाठीचे कपडे स्वत: ग्राहकांच्या घरी जाऊन घेऊन येणे, ब्यूटी पार्लर व सलूनच्या सेवांची होम सर्व्हिस देणे, ग्राहकांनी मागविलेली स्टेशनरी, फुले घरपोच देणे, घरी जाऊन ग्राहकांचे शिवणकाम घेणे, झेरॉक्स आणि प्रिंटर घरीच आणून ठेवणे आणि ग्राहकांनी ईमेलद्वारे पाठविलेल्या कागदपत्रांचे झेरॉक्स त्यांना घरपोच देणे, अशी व्यवसायाची नवी पद्धत आता जोर धरू लागली आहे.
चौकट :
ना दुकानावर गर्दी
ना संसर्गाची भीती....
आमचा व्यवसाय बंद ठेवणे आता आम्हाला परवडणारे नाही. व्यवसाय बंद ठेवला तर खायचे काय, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे नियमांच्या चौकटीत राहून आम्ही व्यवसाय करत आहोत, फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. शासनाच्या नियमावलीनुसार आम्ही दुकान उघडत नाही, केवळ ग्राहकांना काही गोष्टी घरपोच देत आहोत, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करत नाही. ज्याप्रमाणे रस्त्यावरील फूड स्टॉलवर किंवा हॉटेलमधून पार्सल घरी नेण्यावर बंदी नाही, त्याचप्रमाणे आम्हीही आमचा व्यवसाय करत आहोत. या नव्या पद्धतीमुळे दुकानावर गर्दी होत नसल्याने संसर्गाचा धोका राहात नाही, असे व्यावसायिकांचे मत आहे.