औरंगाबद: राज्यातील ९० टक्के व्हेंटिलेटर सुरळीत आहेत. काही प्रमाणात निकृष्ट व्हेंटिलेटर असतील तर कारवाई निश्चित झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र, यावरून राजकारण करू नये असेही फडणवीस यांवेळी म्हणाले. फडणवीस यांनी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील कोरोना परिस्थिती आणि संभाव्य तिसरी लाट याबाबत आढावा घेतला.
मागील काही दिवसांपासून केंद्राने दिलेल्या व्हेंटिलेटरच्या नादुरुस्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन व्हेंटिलेटरच्या ऑडिटचे आदेश दिले आहेत. राज्यात देखील खराब व्हेंटिलेटरचा मुद्दा पुढे आला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला ५ हजार व्हेंटिलेटर केंद्राने दिले आहेत. परंतु ते सगळेच खराब आहेत, असे बोलून राजकारण करणे योग्य नाही असे म्हटले आहे. तसेच राज्यातील ९० टक्के व्हेंटिलेटर सुरळीत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. जर काही व्हेंटिलेटर निकृष्ट असतील तर कारवाई निश्चित झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोना लसीकरण आणि तुटवडा हा मोठा प्रश्न सध्या राज्यांना सतावत आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून योग्य प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. यावर फडणवीस यांनी, लसीकरणाबाबत केंद्राने व्यापक कार्यक्रम तयार केला आहे. २०० कोटी लसीचे उत्पादन करून डिसेंबरपर्यंतचा लसीकरण आराखडा केंद्राने आखला असल्याचे त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसिस व रेमडेसीविर इंजेक्शन बाबतही त्यांनी उत्पादन वाढीचा दावा केला आहे. मराठवाडा विभागाचा पॉझिटिव्ह दर २१ टक्के असून केवळ औरंगाबाद आणि लातूर येथील स्थिती आटोक्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यावर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.