औरंगाबाद : परवानगी नसलेल्या हॉटेल. ढाब्यांवर दारु पिण्यास कायद्याने बंदी आहे. बीड बायपास रोडवरील गांधेली फाटा येथील 'यारा दा ढाबा' येथे सात जणांना दारु पिणे चांगलेच महागात पडले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ढाब्यावर छापा मारीत मालकासह दारु पिणाऱ्यांवर बुधवारी रात्री कारवाई केल्याची माहिती निरीक्षक ए. जे. कुरेशी यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर ढाबे, हॉटेलमध्ये अवैधपणे दारुची विक्री करणारे आणि दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील परिसरातील बहुतांश ढाब्यावर दारु पिणे बंद करण्यात आले आहे. मात्र, बुधवारी रात्री गांधेली परिसरातील बीड बायपास रोडवरील 'यारा दा ढाबा' येथे दारु पिण्यात येत असल्याची माहिती पथकास मिळाली.
त्यानुसार निरीक्षक कुरेशी, राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक बालाजी वाघमोडे, गणेश इंगळे, बी.ए. दौंड, जी.एस.पवार, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, जवान विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे, अनिल जायभाये, गणेश शिंदे व ठाणसिंग जारवाल यांच्या पथकाने ढाब्यावर छापा मारला. या छाप्यात ढाबा मालक मखन सिंग चंदन सिंग काह्लो (रा. उस्मानपुरा) याच्यासह कमलेश शेषराव दाभाडे (रा. इंदिरानगर), किशोर रुपचंद शिंदे (रा. गजानननगर), निलेश नवलसिंग चंदनसे (रा. गांधेली), मनोज एकनाथ मिसाळ (रा. जयभवानीनगर), अभिजित मधुकरराव प्रधान (रा. अरिहंतनगर), प्रफुल्ल उत्तमराव प्रधान (रा. जवाहर कॉलनी), सुनील दिगंबर सोनवणे (रा. न्यू हनुमाननगर) यांना पकडण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी दारु पिल्याचेही स्पष्ट झाले. या कारवाईत ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध ठिकाणी दारु पिऊ नका शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही ढाबे, हॉटेलवर अवैधपणे दारु पिताना आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. तसेच ढाबा, हॉटेलमालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अवैध ठिकाणी दारु पिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराच अधीक्षक संतोष झगडे यांनी दिला आहे.