औरंगाबाद : चालु महिन्यातील विज बील भरले नसल्यामुळे आपली वीज सायंकाळी ९.३० वाजता बंद करण्यात येईल, असा बनावट मेसेज सेवानिवृत्त प्राध्यापिकेच्या पतीला आला. पतीने हा मेसेज पत्नीला पाठवला. पत्नीने त्या मेसेजमधील नंबरवर संपर्क साधल्यानंतर सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर बँक खात्यातील ९ लाख ८९ हजार ८७७ रुपये डेबिट झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सेवानिवृत्त प्राध्यापिका निलीमा मुरुगकर (६५, रा. बी.५, मेरेडिअम स्टेटस, विश्रामबाग कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती सुभाष लोमटे यांच्या मोबाईलवर २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता 'डिअर कस्टमर इलेक्ट्रीसिटी पॉवर वील बी डिसकनेक्टटेड टु नाईट ॲट ९.३० पीएम फ्राम इलेक्ट्रिसीटी ऑफीस बिककॉझ यूवर प्रिव्हिअस मंथ बील नॉट अपडेट. प्लिट कॉन्टॅक्ट इमिडिएटली विथ अवर इलेक्ट्रिसीटी ऑफिसर ॲट ९६४१०७४८२६' असा मेसेज आला. त्यानंतर लोमटे यांनी पत्नीला फोन करुन विज बिलाचा प्राब्लेम आहे? मला मेसेज आला आहे. तो मेसेज तुमच्या मोबाईलवर फाॅरवर्ड करतो. ते बघुन घ्या' असे सांगितले.
पतीकडून आलेला मेसेज वाचून त्यातील मोबाईल नंबरवर मुरुगकर यांनी संपर्क साधला. तेव्हा समोरील सायबर भामट्याने त्यांना तुमचे वीजबील भरलेले नाही, असे सांगितले. त्यावर मुरुगकर यांनी वीज बिल भरल्याचे सांगितले. त्यानंतर साबयर भामट्याने वीज भरले असले तरी अपग्रेड झालेले नाही. तुम्ही दहा रुपये भरुन अपग्रेड करुन घ्या, दहा रुपये भरण्यासाठी मी जे सांगतोय ते करा असे सांगितले. सायबर भाामट्याने सांगितल्याप्रमाणे मुरुगकर प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातुन काही वेळाच्या अंतराने ७ वेळा पैसे डेबिट झाले. डेबीट झालेली रक्कम ९ लाख ८९ हजार ८७७ एवढी आहे. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर वेदांतनगर ठाण्यात वर्ग केला. अधिक तपास निरीक्षक सचिन सानप करीत आहेत.
अनोळखींनी माहिती देऊ नकाअनोळखी व्यक्तींना आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये. मोबाईलवर आलेल्या अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नये. माहिती नसलेले ॲपही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करु नयेत. कोणतीही संस्था, बॅँक तुम्हाला ऑनलाईन माहिती मागत नाही.- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर शाखा