लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता कामा नये. त्यांचे विचार आत्मसात करावेत. आधी गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन करावे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांवर मोजकी पुस्तके मिळतात. त्यातही आपण नुसते वादात पडतो. हा खोटा इतिहास लिहिला आहे, असे म्हटले जाते; पण सरकार पुराव्यांसह पुस्तके का काढत नाही, ज्यात वादग्रस्त वाक्य नसेल. त्यामुळे सरकारनेच चांगले पुस्तक काढले पाहिजे, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव’ साेहळ्याचे उद्घाटन मंगळवारी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ होते. यावेळी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र संचालक डॉ. आनंद देशमुख यांची उपस्थिती होती. राज्यसभेवर घ्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी गेलो नव्हतो, तर त्यांनी मला बोलावून घेतले आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. केवळ वंशज म्हणून नव्हे तर विचारांचा वारस आहे, ते त्यांनी पाहिले, असेही ते म्हणाले.
पीएच.डी. करून डाॅ. संभाजीराजे छत्रपती होणारछत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन कसे करता येते, या किल्ल्यांचे आजच्या काळात महत्त्व काय, यावर मी पीएच.डी. करणार आहे. दोन वर्षांनंतर डाॅ. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर विद्यापीठाने बोलवावे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.