दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड
---
औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र राज्यभर आहे. जिल्ह्यात ३४ डीएड महाविद्यालयांत २ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी पार पडलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत केवळ ७०७ अर्ज आले. त्यामुळे दोन तृतीयांश जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. खाजगी शाळांत मिळणारे तुटपुंजे मानधन आणि दुरापास्त झालेल्या सरकारी शाळांतील नोकरीमुळे अलीकडे शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, म्हणत डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यात २०१० पर्यंत ९० महाविद्यालये कार्यरत होती. विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे कालांतराने अनेक महाविद्यालये बंद पडत गेली, तर काही महाविद्यालयांनी प्रवेश बंद केल्याने सध्या १ अनुदानित, ३ शासकीय आणि ३० खाजगी डीएड महाविद्यालये सुरू आहेत. २००० ते २०१० हा कालखंड डीएड महाविद्यालयांसाठी सुवर्ण काळ होता. गुणवत्तेवर आधारित प्रवेश क्षमतेत बहुतांश वेळी बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी डीएड करण्याचा आग्रह धरत. मात्र, सरकारी शाळांतील शिक्षक भरती होत नाही. शिवाय खाजगी शाळांत दिले जाणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेऊन विद्यार्थी रोजगार पूरक अभ्यासक्रमांना आता प्राधान्य देत आहेत.
---
जिल्ह्यातील डीएड कॉलेज -३४
एकूण जागा -२३००
आलेले अर्ज -७०७
---
नोकरीची हमी नाही !
डीएड, बीएड करून नोकरी हमखास मिळेल त्याची हमी नाही. शासकीय नोकर भरतीला लागलेला खो आणि अनुदानित शाळांत नोकरी मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे, यापेक्षा व्यवसाय किंवा इतर नोकरी करणे परवडते, असे मत विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. २०११ नंतर केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे डीएडची क्रेझ कमी झाली. विद्यार्थी बारावीनंतर बीबीए, एमबीए, एमएसडब्ल्यू यासारख्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.
----
...म्हणून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश
२००८ च्या माझ्या बारावीच्या ५० जणांच्या बॅचमध्ये २३ जणांनी डीएडला प्रवेश घेतला. त्यातील बहुतांश जणांना नोकरी मिळाली. मात्र, आता २०११ पासून केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्याने डीएडची क्रेझ कमी झाली. डीएड केल्यावरही नोकरी मिळेल याची हमी नसल्याने बहुतांश विद्यार्थी व्यवसाय पूरक अभ्यासक्रमांकडे वळतात.
- श्रीकांत सरवदे, शिक्षक, महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, औरंगाबाद
---
प्राचार्य म्हणतात
दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवेशासाठी १८ ते २० हजार अर्ज येत होते. हे प्रमाण प्रवेश क्षमतेच्या पाच पट अधिक होते. आता प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मेही अर्ज येत नाहीत. २०१० नंतर डीएड केल्यावर नोकरी मिळेलच, असे चित्र न दिसल्याने हळूहळू डीएडकडे विद्यार्थी पाठ फिरवायला लागले आहेत.
- डाॅ. कलीमोद्दीन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद