"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:10 PM2022-07-04T13:10:22+5:302022-07-04T13:11:22+5:30
दोन तास सोबत बसून गप्पा मारल्यानंतरही आमदार अब्दुल सत्तारांनी काही कळू दिले नाही.
औरंगाबाद: सुरतला जाण्याआधी दोन तास जयंत पाटील आणि मला आमदार अब्दुल सत्तार बोलत होते, पण सुरतचे काही कळू दिले नाही. तिकडे जाताच नेहमी मोठ्याने पट्टीचे बोलणारे सत्तार शांतच आहेत, मंत्रिमंडळ विस्तारानंतरच आता ते बोलतील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काढला. तसेच व्हायरल व्हिडिओवरून संदीपान भुमरे यांच्यावर देखील पवार यांनी निशाणा सांधला.
विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोर गटातील संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यावर मिश्किल टोले लगावले. ''नेहमी मोठ्याने पट्टीचे बोलणारे अब्दुल सत्तार शांत आहेत. सुरतला जाण्याआधी सांगितले नाही. जयंत पाटील आणि मला दोन तास बोल्यानंतर सत्तार गेले. पण काही बोले नाही. फक्त एकदाच जेवायलो जातो म्हणाले. बहुतेक मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच ते बोलतील, तोपर्यंत जास्त बोलयाचे नाही वाटत'',असा चिमटा पवार यांनी काढला.
भुमरे यांच्यावरही केली टीका
पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कार्यकर्त्यांना सर्वांना झोंबणाऱ्या पोस्ट टाका असे आदेश भुमरे देत आहेत. याचाच संदर्भ देत अजित पवारांनी भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आपण आमदार आहात तरी असे बोलता,काय हे ? असे सवाल पवार यांनी भुमरेंना केले.