छत्रपती संभाजीनगर : कोणतेही चांगले काम करण्यासाठी ‘आजकाल वेळ नाही वेळ नाही’ असे प्रत्येक जण म्हणत असतो. मात्र, त्याचवेळी ते मोबाइल पाहण्यात मोठा वेळ वाया घालवतात हेच त्यांना लक्षात येत नाही. स्क्रीन टाइम कमी करून तो वेळ धार्मिक कार्यात, समाजसेवेत द्या, असे प्रतिपादन मुनिश्री हंसबोधी विजयजी म.सा. यांनी येथे केले.
जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्यावतीने जाधवमंडीतील विमलनाथ जैन मंदिरात पर्वाधिराज पर्यूषण पर्वाकाळ उत्साहात सुरू आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे. बुधवारी पर्यूषण पर्वाच्या दुसऱ्या दिवशी विशेष प्रवचनाच्यावेळी मुनीश्री प्रेमहंस विजयजी म.सा. यांची उपस्थिती होती. मुनीश्री पुढे म्हणाले की, कोणताही ‘जीव’ हा क्षुद्र नसतो सर्व ‘जीव’ श्रेष्ठ असतात. कोणत्याही ‘जिवा’ला जगण्याची इच्छा असतेच, मग ती लहानातील लहान ‘मुंगी’, ‘डास’ का असेना. त्यांच्या जगण्याच्या इच्छे विरुद्ध त्यांना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. सर्व जीवमात्रावर प्रेम करा. हिंसा करून आपले पोट भरू नका, अहिंसावादी जीवन जगा व सर्वात्तम आहार शाकाहार आहे हे लक्षात ठेवा व शाकाहारी बना, शुद्ध, सात्त्विक आहारामुळे तुमच्या विचारातही परिवर्तन घडेल. कारण, मनुष्य जीवन हे सहजासहजी प्राप्त होत नाही. या जीवनाचे सार्थक करा व आचार, विचार व कर्म पवित्र ठेवून ‘चांगला माणूस’ बनण्याचा प्रयत्न करा,असे आवाहनही मुनीश्रींनी सर्वांना केले. पर्यूषण पर्व यशस्वीतेसाठी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघाचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती, पोपटलाल जैन, रूपराज सुराणा, राजेश संचेती, कांतीलाल मुथा, मदनलाल जैन, अभय बोरा, नीलेश जैन, आनंद चोरडिया, युवराज संचेती, विजय कोठारी यांच्यासह चातुर्मास समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
१९ सप्टेंबरला पर्यूषण पर्व सांगतापर्यूषण पर्वाची सांगता १९ सप्टेंबरला होणार आहे. सकाळी ८:३० वाजेपासून बारसासत्र पूजन, अष्टप्रकारी पूजा, ज्ञान पूजा, बारसासूत्र वाचन पश्चात चैत्यपरिपाटी, वार्षिक संवत्सरी महापर्व ‘प्रतिक्रमण’ दुपारी ४ वाजता कुमारपाल महाराजाद्वारा महाआरती व भक्ती भावना असे कार्यक्रम असणार आहेत.