छ. संभाजीनगर - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाची गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चा होत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपाने चाचपणीही सुरू केल्याचं बोललं जातंय. त्यातच, आता महायुतीमध्ये अजित पवार यांचा गटही सक्रीय झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडूनही येथील मतदासंघासाठी लॉबिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच अनुषंगाने श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ते पत्रकारावर चिडल्याचं पाहायला मिळालं.
खासदार श्रीकांत शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वयावर भाष्य केलं. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे तुमच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर डॉमिनेटींग होतय का? असा प्रश्न खासदार शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, तुम्ही माझ्या मतदारसंघाची काळजी करू नका... असे म्हणत श्रीकांत शिंदे काही प्रमाणात चिडल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांनी शिस्तीत उत्तर दिलं.
आगामी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि दिल्लीतील वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चर्चा करून ही सर्वच वरिष्ठ नेतेमंडळी काय ते ठरवून घेईल. त्यामुळे यावर आत्ता विनाकारण चर्चा करण्यात अर्थ नाही. तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे. नेत्यांमध्येही चांगला समन्वय आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी यावेळी म्हटले.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार बनले होते. मात्र, यावेळी भाजपाकडून ही जागा लढवण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाकडूनही कोण उमेदवार देण्यात येईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे, कल्याण लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यातच, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात दौरा केला होता.