औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मुलींच्या वसतिगृहाशेजारील रस्त्यावर रविवारी रात्री दोघा जणांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. या दोन्ही मृतांची ओळख पटली असून, चार जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.
मृतांमध्ये नागेश्वर शिवलिंगअप्पा घुसे (५५, रा. कोहिनूर कॉलनी) व संग्राम रंकट (७०) यांचा समावेश आहे. शहर पोलिसांनी शेख वजीर शेख बशीर (३२, रा. कोहिनूर कॉलनी) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहेे. घाटी पोलीस चौकीतील हवालदार शेषराव गवळी यांनी घाटी रुग्णालयाच्या समोरील फुटपाथवर दोन जण बेशुद्ध पडलेले असून, त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला असल्याचा संशय असल्याचे बेगमपुरा ठाण्यासह ११२ नंबरवर कळविले. तेथील पोलिसांची धावपळ उडाली. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी थेट घटनास्थळ गाठले. तसेच बेगमपुरा, गुन्हे शाखा, सिटी चौक, छावणी, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी पोहोचले. सुरुवातीला खून झालेल्या दोघांची ओळख फुटपाथवरील इतरांकडून पटवली. तसेच त्यांच्यासोबत कोण राहते, याविषयी माहिती घेतली असता संशयित आरोपी शेख वजीर शेख बशीर याचे नाव सांगण्यात आले. त्याशिवाय इतर तीन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील शेख वजीर याने नशेमध्ये खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. मृत नागेश्वर यांचे भाऊ सहायक पोलीस उपनिरीक्षक असून, त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
संशयित आरोपी नशेखोरशहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा प्रचंड नशेखोर आहे. त्यास ताब्यात घेतले, तेव्हाही तो प्रचंड दारू प्यायलेला होता. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जोरजोरात भांडणे सुरू होती. मात्र, हे नेहमीचेच असल्यामुळे त्याकडे इतरांनी दर्लक्ष केले. घुसे यांच्या डोक्यात दगड घालून तर रंकट यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.