संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वापरापेक्षा जास्त वीजबिल येणे, या तक्रारी ग्राहकांकडून वाढतच आहेत. त्यात आता रीडिंग उशिरा घेतल्याने बिल अधिक येत असल्याची ओरड होत आहे. कारण वीज वापर १०० युनिटच्या पुढे जाताच, त्यापुढील प्रत्येक युनिटसाठी दुप्पट दर ग्राहकांना मोजावा लागतो. पण दर महिन्याला ठरावीक दिवशीच रीडिंग घेतले जाते. शिवाय स्लॅबनुसारच दर आकारले जातात. त्यामुळे ग्राहकांना कोणताही, भुर्दंड, फटका बसत नाही, असे महावितरणने स्पष्ट केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रीडिंग घेणे लॉकडाऊनमुळे शक्य झाले नव्हते. तेव्हा जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांतील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे वीजबिल आकारण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रीडिंग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले. यामुळे अधिक वीजबिलाच्या तक्रारी झाल्या. ग्राहकांतून संतापही व्यक्त झाला. त्यापाठोपाठ आता रीडिंग घेण्यास विलंब झाल्याने वीजबिल अधिक येत असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. शंभरापुढील प्रत्येक युनिटसाठी अधिक दर आहे. त्यातूनच अधिक बिल येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
--------
ही घ्या उदाहरणे...
उदाहरण १ : वीजग्राहक गौतम हिवराळे म्हणाले, लाॅकडाऊन काळात अधिक वीजबिल आले. अधिक आलेल्या बिलात सवलत मिळेल, म्हणून ग्राहकांनी बिल भरले नाही. पण वीजबिलात सवलत काही मिळाली नाही. किमान महावितरणने चक्रवाढ व्याज लावू नये.
उदाहरण २ : अक्षय पवार म्हणाले, वीजबिलात सवलत काही मिळत नाही. अतिरिक्त व्याज भरून आता कंटाळा आला आहे. वीजबिल कमी येईल, यादृष्टीने महावितरणने ग्राहकांना मार्गदर्शन केले पाहिजे. पण तसे होत नाही.
-------
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण
वीजग्राहकांना बिलासंदर्भातील तक्रारी मोबाइल ॲप, टोल फ्री क्रमांक, महावितरणाच्या संकेतस्थळावर करता येतात. शिवाय महावितरण कार्यालयात येऊनही तक्रार करता येते. चुकीची माहिती, गैरसमज यातून बिल अधिक आल्याचे ग्राहकांना वाटते. परंतु त्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. दर महिन्याला नियोजित दिवशी रीडिंग घेतले जाते. रीडिंग उशिरा घेतले जात नाही. रीडिंगला उशीर झाला तरी ग्राहकांना भुर्दंड बसत नाही. ग्राहकांना अचूक बिल दिले जाते, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
-------
१०० युनिट
सुरुवातीच्या म्हणजे १ ते १०० युनिटच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ३ रुपये ४४ पैसे दर आकारला जातो. घरगुती ग्राहकांना देण्यात येणारे हे वीजदर हे सवलतीचे दर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. १०० युनिटच्या पुढील वीज वापरासाठी स्लॅबचा फायदा मिळतो.
-------
१०१ पासून ३०० युनिट
१०१ पासून ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ७ रुपये ३४ पैसे वीजदर आकारला जातो. म्हणजे रीडिंग घेईपर्यंत ग्राहकांचा वीज वापर जर १०० युनिटच्या आत असेल तर त्यासाठी प्रतियुनिट ३.४४ रुपयांचा दर लागेल. पण १०० युनिटवरील प्रत्येक युनिटच्या वापरापोटी ७.३४ रुपयांच्या दराने बिल भरावे लागेल.
----
३०१ ते ५०० युनिट
३०१ ते ५०० युनिट वीज वापरासाठी प्रतियुनिट १० रुपये ३६ पैसे दर आहे. तर ५०१ ते एक हजारपर्यंत प्रतियुनिट ११.८२ रुपये आणि एक हजारपुढेही प्रतियुनिट ११.८२ रुपये वीजदर ग्राहकांना मोजावा लागतो. वीजबिलाच्या पाठीमागे वीजदराचे हे स्लॅब ग्राहकांच्या माहितीसाठी देण्यात येतात.
--------
महावितरणचे ग्राहक
-घरगुती : ६,१२,७७९
- कृषी : २,२३,९८३
- औद्योगिक : १४,९४१