औरंगाबाद : बारा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेच्या चारित्र्यावर पतीसह सासरच्यांनी संशय घेत सतत मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून विवाहितेने ६ सप्टेंबर रोजी जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी महिनाभराने पतीसह दीर, सासूच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
मनीषा विजय हाके असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, मनीषाचा १ एप्रिल २०१० रोजी विजय गजानन हाके याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर पहिल्या महिन्यात मनीषाला दिवस गेल्यापासून तिच्या चारित्र्यावर नवऱ्यासह सासू, दीर संशय घेत होते. पहिले झालेले मूल आमचे नाहीच, असेही तिला हिणवत होते. त्याशिवाय माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावण्यात येत होता. या सर्व छळाला कंटाळून तिने ६ सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी नातेवाइकांनी सासरच्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. त्यासाठी अंत्यसंस्कार करण्यासह नकार देत मृतदेह ठाण्यासमोर आणण्याची धमकी दिली होती. मात्र, सासरच्यांवर गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यानुसार पती विजय हाके, दीर अजय हाके आणि सासू शोभाबाई हाके (रा. कोकणवाडी चौक) यांच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
तिन्ही आरोपी पसार
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. तपास अधिकारी कैलाश जाधव यांनी आरोपींच्या घराची झडती घेतली असता, कोणीही आढळून आले नाही. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.