औरंगाबाद : एसबीआय बँक कस्टमर केअर सेंटरचा अधिकारी बोलत असल्याची थाप मारून भामट्याने खासगी कंपनीतील उच्चपदस्थाच्या बँक खात्यातून ४ लाख ५५ हजार ६८१ रुपये ऑनलाईन लांबविले. सोमवारी (दि. ४) घडलेल्या या घटनेचा सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिकलठाणा एमआयडीसीतील हिंदुस्थान कार्पोरेशन लिमिटेड कंपनीतील प्रशासकीय सहायक रवींद्र राजपूत (वय ४६, रा. गजराजनगर, सिडको एन ८) हे ४ ऑक्टोबर रोजी कंपनीत गेले होते. त्यांना एसबीआयच्या म्युच्युअल फंडामध्ये ३ हजार रुपये ऑनलाईन टाकायचे होते. त्यांच्याकडून नजरचुकीने ३० हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये जमा झाले. त्यांनी एजंट शहबाज खान यास फोन करून ही माहिती दिली. खान यांनी राजपूत यांना ऑनलाईन जाऊन एसआयपी टाईप करा, असे सांगितले. त्यानंतर एसबीआय कस्टमर केअरला फोन केला असता, कस्टमर केअरने एक कॉल येईल, असे सांगितले.
काही वेळातच एक फोन आला़. त्यावर एसबीआय बँकेचा कस्टमर केअर अधिकारी अंकित शर्मा बोलतो, असे त्याने सांगितले. तसेच 'एनी डेस्क' नावाने ॲप डाऊनलोड करायला सांगितले. ऑनलाईन इंटरनेट बँकिंग सुरू करण्यास सांगून लिंक पाठवून वेबसाईटवर जाऊन लॉगिंग करण्याची सूचना केली. लॉगिंग केल्यावर त्यांनी २४ आकडी नंबर टाकण्यास सांगितले़. तो नंबर टाकल्यानंतर काही वेळात उर्वरित पैसे जमा होतील, असे सांगितले; मात्र सायंकाळी ६ वाजता राजपूत यांनी बँक खात्यातील रक्कम तपासली असता, खात्यातून ४ लाख ५५ हजार ६८१ रुपये कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अंकित शर्माचा नंबरही लागला नाही़. यावरून आपली फसवणूक झाल्याचे राजपूत यांच्या लक्षात आले. त्यांनी ५ ऑक्टोबरला याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर अधिक तपास करीत आहेत.