औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता घेण्याचे काम मागील दोन आठवड्यांपासून सुरू होते. पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) बुधवारी महाराष्ट्र जीवन प्र्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी मान्यता दिली. १६९४ कोटी ५९ लाख रुपयांचा हा डीपीआर आहे.
समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे वाटोळे झाल्यानंतर राज्यमंत्री अतुल सावे यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहराच्या पाणीपुरवठ्यात लक्ष घालण्याची विनंती सावे यांनी केली. फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत सुधारित असा आराखडा तयार केला. यश इनोव्हेशन सोल्युशन्स या कंपनीकडून युद्धपातळीवर योजनेचा डीपीआर तयार करून घेण्यात आला. डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक होती.
महापालिकेने डीपीआर प्राधिकरणाकडे पाठविला. प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देण्यासाठी महापालिकेकडे योजनेच्या कि मतीच्या एक टक्के (१७ कोटी रुपये) शुल्क मागितले. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने पुन्हा सावे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नगरविकास विभागाने महापालिकेकडून शुल्क देण्याची हमी दिली. यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डीपीआरमध्ये सुमारे ६० त्रुटी काढल्या. त्याची पूर्तता करून महापालिकेने डीपीआर पुन्हा जीवन प्राधिकरणाकडे सादर केला. प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यांनी डीपीआर प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे सादर केला. सदस्य सचिवांनी बुधवारी सायंकाळी डीपीआरला तांत्रिक मान्यता दिली, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली.
सदस्य सचिवांनी मंजूर केलेल्या तांत्रिक मान्यतेचा डीपीआर गुरुवारी औरंगाबादेत जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याच्या कार्यालयाला प्राप्त होईल. त्यानंतर मुख्य अभियंत्यांकडून महापालिकेस डीपीआरला तांत्रिक मान्यता मिळाल्याचे पत्र दिले जाईल. हे पत्र मिळाल्यावर प्रशासकीय मान्यतेसाठी डीपीआर शासनाच्या नगरविकास खात्याला सादर केला जाईल.- डॉ. निपुण विनायक, मनपा आयुक्त