औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा नामविस्तार दिन येत्या गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेतील प्रथम आलेल्या २५ गुणवंतांना सुर्वणपदकांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे व्याख्यान होणार आहे.
विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम होईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहील. फिजिकल डिस्टिन्सिंग ठेवून हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी केले आहे.
Ø
सुवर्णपदक विजेत्यांत मारोती खरात (एम.ए.मराठी), प्रगती कोरडे (एम.ए.इंग्रजी), अनिता रायमल (बीए इंग्रजी), ऐश्वर्या टाक (बी.जे.), आरती घुगरे (बी.एस्सी), अजित वावरे (एमएस्सी रसायनशास्त्र), सुमेध चव्हाण (एम.एस्सी वनस्पतीशास्त्र), मनोहर मस्के (संख्याशास्त्र), ज्ञानेश्वर तोंडे (गणित), भय्यासाहेब गायकवाड (संगणकशास्त्र), आवाड शिवकन्या (जीव रसायनशास्त्र), प्रतीक डाके (एमबीए), रिध्देश काथार (बीई मेकॅनिकल), अक्षिता मुसांडे (बी.ई.केमिकल), स्मिता रातवाणी (बी.कॉम), अखिल कैद फादल अली (एम.कॉम), आदित्य शिंदे (एलएलएम), मेराज फातेमा (बी.एड), धनश्री वरकड (बी.एड) व रामशा इफ्त सय्यद कलीमोद्दीन (बी.एड), आदींचा समावेश आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.