- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) यांना नुसतं एकदा पाहिलेली, अनेकदा पाहिलेली, त्यांचा थोडा तरी सहवास लाभलेली माणसं हळूहळू आता दुर्मीळ होत चाललेली आहेत. ‘मिलिंद’मध्ये शिपाई राहिलेले शिवराम जाधव व बाबासाहेबांची दाढी, कटिंग करून शाबासकी मिळवलेले बाबूलाल गारोल, मिलिंद मैदानाची त्याकाळी देखभाल करणारे रज्जाक आपल्यात नाहीत.
‘मिलिंद’च्या बांधकामाच्या वेळी सुतारकीची कामे करणारे कचरुबाबा कुंजाळे आज वयाच्या १०५ व्या वर्षी ढिंबर गल्लीत आजारी अवस्थेत आहेत. या सर्व मंडळींनी बाबासाहेबांना पाहिले होते. ज्या टेबलावर बाबासाहेब जेवले होते, तो टेबल शिवराम जाधव यांनी सांभाळून ठेवलेला. दाढी, कटिंग चांगली केली म्हणून बक्षिसापोटी दिलेले दहा रुपये गारोल यांनी सांभाळून ठेवलेले. आता ही सारी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. बोटावर मोजता येतील, अशी काही माणसांशी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संवाद साधण्याचा केलेला हा प्रयत्न......
बाबासाहेब माने म्हणतात........आंबेडकर घराण्याचा व वराळे घराण्याचा ऋणानुबंध होता. बळवंतराव वराळे हे माझे मामा. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्याचा मला योग आला. पुढे मिलिंद महाविद्यालयात शिकायला आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब औरंगाबादला येत, तेव्हा मला त्यांना पाहण्याचा योग आला; परंतु मला इंग्रजी चांगले येत नव्हते, म्हणून मी त्यांच्यापुढे जाऊ शकत नव्हतो. कानडी ही माझी मातृभाषा. औरंगाबादला आल्यानंतर मला भाषेची अडचण जाणवू लागली. बाबासाहेब इंग्रजीतून काही विचारतील, या भीतीने मी बाबासाहेबांपुढे जात नसे. धारवाडला एकदा मातोश्री रमाई यांनी मला उचलून घेतले. माझ्या आईला उद्देशून म्हणाल्या, ‘तुझा मुलगा काळा आहे, पण गुटगुटीत आहे.’ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. ‘युगयात्रा’ नाटकाच्या प्रयोगासाठी नाट्यकलावंत म्हणून मी वराळे कुटुंबीयांसमवेत नागपूरला गेलो होतो. धम्मदीक्षेचा तो ऐतिहासिक सोहळा पाहिला. बाबासाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. ते दृष्य आजही माझ्या मन:चक्षूंसमोर जसेच्या तसे उभे राहते. बाबासाहेबांचे हे शेवटचेच दर्शन होते.
अनंत दाशरथे म्हणतात......वयाच्या पंधराव्या वर्षी मला मिलिंद कॅम्पसमध्ये नोकरी लागली होती. बाबासाहेब कधी मुंबईहून तर कधी दिल्लीहून औरंगाबादला ‘मिलिंद’चे बांधकाम पाहण्यासाठी यायचे. सकाळी ते आरामखुर्चीत बसायचे. सोबत माईसाहेबही असायच्या. रुंजाजी भारसाकळे यांच्या खोलीतून बाबासाहेबांची खुर्ची आणून ठेवली जात असे. बाबाबाहेबांची बसण्याची व्यवस्था म. भि. चिटणीस करायचे, तिथे खुर्ची नेऊन ठेवण्याचं काम मी करीत असे. आजही ‘मिलिंद’च्या वस्तूसंग्रहालयात ही खुर्ची आहे. मला हे काम खूप विशेष वाटत होते. त्यांच्याजवळ उभे राहण्याची मला संधी मिळत होती. १९५५ नंतर माझी बाबासाहेबांची भेट झाली नाही; मात्र पुढे तिथेच काम करण्याची संधी मिळाली. आज मी ८२ वर्षांचा आहे. बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत, त्या सर्वांसोबत ‘शेअर’ करीत असतो.
प्र. ज. निकम गुरुजी सांगतात....बाबासाहेब जाण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. मी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होतो. टीचर्स डे होता. मुलंच शिक्षक बनून वर्गावर जाऊन शिकवीत असत. मी ज्या वर्गात शिकत होतो, त्याच वर्गावर मी गणिताचा शिक्षक म्हणून शिकवीत होतो. मी शिकविण्यात मग्न होतो आणि व्हीलचेअरवर बाबासाहेब वर्गात आले. माझं शिकवणं पाहून बाबासाहेब उद्गारले, अरे हा तर पंतोजीसारखा शिकवतोय. वर्गातून बाबासाहेब गेल्यानंतर माझ्या वर्गमित्रांनी माझं अभिनंदन करीत सांगितलं, हा तर पंतोजीसारखा शिकवतोय, असं बाबासाहेब म्हणत होते. तुझं कौतुक करीत होते. बाबासाहेबांनी त्याकाळी दिलेली ही कौतुकाची थाप मला आयुष्यभर पुरली. पुढे मी गणिताचा शिक्षक म्हणूनच मी नावारूपास आलो. गणित हा माझ्या आवडीचा विषय राहिला. सामाजिक कार्यात बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान राहिले.