- सुमेध उघडेऔरंगाबाद: कोट्यवधी दीनदुबळे, वंचित, पीडितांसाठी तसेच देशासाठी १४ एप्रिल अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti )आनंददायी ठरतो आहे. खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत घराघरात आणि सार्वजनिक स्वरुपात मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाते. एवढेच नव्हे तर एप्रिलमध्ये सोशल मीडियावर भीमजयंती' ट्रेंडिंग' करते आहे. गुगल या सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येला 'drbabasahebambedkar' हा टॉपिक सर्च केला तर सुमारे १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स उपलब्ध झाल्या. सोशल मीडियावरही भीमजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसतेय.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यु ट्यूब या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर सध्या भीमजयंती ‘ट्रेंडिंग’ आहे. व्हायरल झालेले व्हिडीओ, फोटो, ग्राफिक्स, ई-बुक्स यावर बाबासाहेबांच्या विचारांची छाप दिसून येतेय. यातील ट्रेंड मुख्यत: बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून आहेत. यासोबतच त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारे ट्रेंड टॉपिक सर्वांत जास्त वापरात आहेत. यातील #ThanksAmbedkar हा टॅग सर्वांत जास्त चर्चित आहे. बाबासाहेबांमुळे जीवनात झालेला बदल, त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्याने मिळवलेले यश, मान, सन्मान याबद्दल अनेक जण व्यक्त होत आहेत. यासोबतच ‘#भीमजयंती२०२२’ या टॅगखाली यावर्षीच्या जयंतीमधील उपक्रमांच्या पोस्ट चर्चेत आहेत.
व्हिडीओ, फोटो आणि ॲपवरही 'आंबेडकर ब्रँड'बहुसंख्य तरुणाई, विविध क्षेत्रातील नामवंत आज सोशल मीडियावर सक्रिय आहे. अनेकजण सोशल मीडियाला हक्काचे आणि स्वस्त माध्यम मानतात. यामुळेच इंटरनेटचा वापर करून सोशल मीडियात बाबासाहेबांवरील मूळ स्वरूपातील लाखो व्हिडीओ, गाणी, फोटो, ई-बुक्स सहज अपलोड होतात. व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या माध्यमातून हे 'जेन्युईन कटेंट' तुफान व्हायरल होत आहे. १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येला एक नजर रोजच्या वापरातील सोशल साईट्सवर टाकली तर बाबासाहेबांच्या संदर्भात युट्युबवर तब्बल ४ लाख २७ हजार लिंक्स भेटल्या. फेसबुकवर प्रातिनिधिक १०० पेज आणि ५० ग्रुप्सवर प्रत्येकी ५० लाख ८१ हजार फॉलोअर्स तर २३ लाख ८० हजार मेंबर्स आढळून आले. तसेच इन्स्टाग्रामवर प्रातिनिधिक ५० पेजवर २ लाख ८६ हजार फॉलोअर्स आहेत. यावेळी २ लाख ५६ हजार पोस्ट्स इन्स्टाग्रामवर तर ट्विटरवर १७ हजार हॅन्डल्स बाबासाहेबांवर ट्विट करत होते. बाबासाहेब आंबेडकर हा टॉपिक ॲप स्टोअरवरही चांगलाच ट्रेडिंग आहे. स्टोअरवरील प्रातिनिधिक ६० ॲप २२ लाख ३३ हजार स्मार्टफोन युजर्सनी डाऊनलोड केले आहेत. यासह ई-बुक्ससाठी किंडलवर २०० तर गुगल बुक्सवर २ हजार ५०० लिंक्स उपलब्ध आहेत. या आकडेवारीने सोशल मीडियाही 'आंबेडकर ब्रँड'ने व्यापून गेल्याचे चित्र आहे.