- विजय सरवदेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी हे संशोधन कार्यात पुढे आहेत. त्यांचे संशोधन देशातील संशोधनापेक्षा वेगळे व लोकोपयोगी आहे. मात्र, एकदा संशोधन पूर्ण झाले की संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या भानगडीत न पडता अनेक जण एखाद्या राष्ट्रीय परिषदेत पेपर प्रसिद्ध करून मोकळे होण्याची घाई करतात. एकदा पेपर प्रसिद्ध झाला की नंतर पेटंट मिळत नाही. मावळत्या वर्षात विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनाला तब्बल ८ पेटंट आणि १ कॉपी राइट मिळाला आहे, हेही नसे थोडके!
पेटंट, कॉपी राइट, ट्रेडमार्क, डिझाइन या माध्यमातून बौद्धिक संपदेचे रक्षण केले जाते. विद्यापीठात बौद्धिक संपदा नोंदणीकृत करण्यासाठी स्वतंत्र ‘आयपीआर सेल’ स्थापन करण्यात आला आहे. या सेलचे प्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आपल्या विद्यापीठात प्रचंड गुणवत्ता आहे. अनेक प्राध्यापकांचे संशोधन जागितक स्तरावर गाजलेले आहे. आपल्या प्राध्यापकांचे संशोधन जगभरातील अभ्यासक संदर्भासाठी वापर आहेत. मात्र, आपण गुणवत्तेची मार्केटिंग करण्यात कमी पडत आहोत. ते झाल्यास आपले विद्यापीठ गुणवत्तेमध्ये देशातील विद्यापीठांच्या तुलनेत नक्कीच सरस ठरेल; परंतु एवढ्यावरच समाधान न मानता दर्जेदार, लोकोपयोगी संशोधनात सातत्य टिकवले पाहिजे व पेटंट, कॉपी राइट मिळविण्यासाठी प्रत्येक संशोधकाने आग्रही भूमिका घेतली पाहिजे.
आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे. तसे केले नाही, तर आपले ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका आहे. विद्यापीठात अनेक जण संशोधन करतात. संशोधन झाले की एखाद्या राष्ट्रीय परिषदेत त्याचा पेपर प्रसिद्ध करून मोकळे होतात. असे केल्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचा कुठलाही हक्क शिल्लक राहत नाही. ती माहिती जगासाठी मोकळी झालेली असते. एकदा माहिती प्रसिद्ध झाली की, नंतर तिचे पेटंट मिळविता येत नाही. त्यामुळे संशोधकांनी आपल्या संशोधनाचे आधी पेटंट मिळवून आपली बौद्धिक संपदा सुरक्षित करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बौद्धिक संपदा प्राप्त केलेले प्राध्यापक- कुलगुरू डॉ. प्रमोद येवले- २ पेटंट- डॉ. सचिन भुसारी- २ पेटंट- डॉ. कारभारी काळे- २ पेटंट- डॉ. आर. आर. मंझा- २ पेटंट- डॉ. दासू वैद्य- १ (पुस्तक) कॉपी राइट