- विजय सरवदे
औरंगाबाद : विद्यापीठाने पीएच.डी.च्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित केले असून, त्याच्या ‘ट्रायल’ घेणे सुरू आहे. तथापि, आता येत्या चार-पाच दिवसांत संशोधनासाठी मार्गदर्शक व त्यांच्याकडील विषयनिहाय रिक्त जागांची यादी विद्यापीठामार्फत जाहीर केली जाईल, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात पीएच.डी.ची रखडलेल्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०१६ नंतर ‘पेट’ झालीच नव्हती. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार घेतल्यानंतर यंदा तब्बल पाच वर्षांनंतर या परीक्षेची प्रक्रिया राबविली. ‘पेट’चे दोन्ही पेपर ऑनलाइनच घेण्यात आले. ३० जानेवारी रोजी सर्व विषयांसाठी ‘पेट’चा पहिला सामायिक पेपर घेतला. १ फेब्रुवारीला त्याचा निकाल घोषित करण्यात आला. १३ मार्च रोजी ४५ विषयांसाठी ‘पेट’चा दुसरा पेपर घेण्यात आला व १७ मार्च रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत चार हजार २९९ विद्यार्थी पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरले.
दरम्यान, विद्यापीठाने ६ मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत ‘पेट’ पात्र विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. प्रवेशासाठी नोंदणीची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी प्रयत्न केले; पण लिंक उघडलीच नाही. ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘पेट’ आयोजित करण्यापूर्वी विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक व त्यांच्याकडे विषयनिहाय रिक्त जागांची यादी जाहीर करणे आवश्यक होते; परंतु विद्यापीठाने यादी जाहीर न करताच ‘पेट’चे आयोजन केले. त्यानंतर दोन महिन्यांपासून पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया रखडलेली होती. त्यात ‘कोरोना’मुळे आलेल्या निर्बंधाची रखडलेल्या या प्रक्रियेला पुष्टी मिळाली.
संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘ॲप’प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, संशोधनाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी. कोरोनामुळे सतत येणाऱ्या निर्बंधामुळे पीएच.डी.ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी विद्यापीठाने स्वाॅफ्टवेअर विकसित केले आहे. याशिवाय, संशोधक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘ॲप’देखील विकसित करण्यात आले आहे. या ‘ॲप’वर संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचा प्रोग्रेस कळेल. १ जूनपासून राज्यात लागूू करण्यात आलेले निर्बंध उठविले जातील, की पुढे काही दिवस वाढविले जातील, याबाबत आम्ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहात आहोत. असे असले तरी मेअखेरपर्यंत गाइड्स व त्यांच्याकडील विषयनिहाय रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल.