औरंगाबाद: शासकीय विज्ञान संस्थेत संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या जळीत प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांना मानसोपचार समुपदेशकांद्वारे तसेच मेंटाॅरकडून मानसिक समुपदेश करण्यात येणार आहे. तसेच प्राध्यापक, विभागप्रमुखांना विद्यार्थ्यांशी संवाद वाढवा, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्या. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरात ४६ विभागात संशोधक विद्यार्थ्यांसह, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना पुढील आठ दहा दिवसांत मानसोपचार विभागाकडून समुपदेश करण्यासाठी नियोजन करत आहेत. तसेच या संदर्भात समाजात काम करत असलेले मेंटाॅर, सामाजिक संस्थांनाही विविध विभागात बोलवणार आहोत. विद्यार्थ्यांचे समुपदेश करून नैराश्य, अडचणींना समाेरे जाण्यासाठी प्रोत्साहीत करणे, आत्मविश्वास वाढवणे, विद्यार्थ्यांना लक्षकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने समुपदेशन करणार आहोत. तसेच विभागाविभागात जावून विद्यार्थी संवाद तर वाढवू. तसेच प्रत्येक विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुखांनाही विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासंबंधी सुचना देणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राध्यापक, विद्यापीठ प्रशासन मदत करेल. मैत्रीपूर्ण वातावरण निर्मातीसाठी विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न असेल असेही कुलगुरूंनी स्पष्ठ केले. विद्यापीठात सध्या निवडणूका, त्यांनंतर क्रीडा महोत्सव, पदवी,पदव्युत्तर परीक्षांची लगबग आहे. यातून वेळ काढून विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करून कितीही अडचणी आल्यातर त्यातून मार्ग काढून जगण्यासंबंधी समुपदेश करू असेही कुलुगुरू म्हणाले.