औरंगाबाद : मागील दोन दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणि मर्यादित स्वरुपात अभ्यासिका सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक वर्ष आणि वसतिगृहे उघडण्याची प्रतीक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून विद्यापीठातील सर्व वसतिगृहे बंद करण्यात आली आहेत. नोव्हेंबरमध्ये फक्त संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आले.
१५ फेब्रुवारीपासून विद्यापीठातील विविध विभागांत अध्यापन प्रक्रिया सुरु झाली. ग्रंथालय, अभ्यासिका सुरु झाली; परंतु मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे १५ एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. ग्रंथालय व अभ्यासिकाही बंद करण्यात आली होती. आता ७ जूनपासून शासनाने शहरात ‘अनलॉक’ केल्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरील बंधने उठविण्यात आली असून आता पूर्ण क्षमतेने कर्मचारी विविध विभागांत नियमितपणे कामावर येत आहेत. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ८ जूनपासून ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५०० आसन क्षमतेच्या अभ्यासिकेत सध्या कोरोनाच्या नियम व अटीनुसार १२५ आसन क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ग्रंथालयांमधून संदर्भ ग्रंथाचे वितरणही सुरु करण्यात आल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले.